हिंदूंच्या भावना दुखावल्या, तर केरळसारखी शिक्षा मिळेल : भाजप आमदार
एबीपी माझा वेब टीम | 27 Aug 2018 12:28 PM (IST)
बसनगौडा पाटील हे कर्नाटकमधील विजयपुरा येथून भाजपचे आमदार आहेत. कायमच वादग्रस्त विधानांमुळे बसनगौडा पाटील हे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात.
बंगळुरु : महापुरामुळे उद्ध्वस्त झालेलं केरळ आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांचे जीव गेले, अनेकजण बेपत्ता झाले, बेघर झाले... या सर्व गंभीर पार्श्वभूमीवर केरळवासियांना आधार देण्याऐवजी कर्नाटकातील भाजप आमदाराने जखमेवर मीठ चोळलं आहे. गोहत्यांमुळे केरळमध्ये महापूर आल्याचं धक्कादायक विधान भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनी केले आहे. तसेच, हिंदूंच्या भावना दुखावल्या, तर केरळसारखी शिक्षा मिळेल, असेही आमदार पाटील म्हणाले. बसनगौडा पाटील हे कर्नाटकमधील विजयपुरा येथून भाजपचे आमदार आहेत. कायमच वादग्रस्त विधानांमुळे बसनगौडा पाटील हे चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. भाजप आमदार बसनगौडा पाटील नेमकं काय म्हणाले? "जर हिंदूंच्या भावनांना भडकावलं, तर धर्म शिक्षा देईल. उदाहरणादाखल केरळमधील घटना पाहू शकता काय झालं. केरळला देवभूमी म्हटलं जातं, मात्र इथे गोहत्या होत होत्या. बीफ फेस्टिव्हल झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच केरळला महापुराने वेढलं. त्यामुळे जो कुणी हिंदूंच्या भावना दुखावेल, त्यांना अशाच प्रकारे शिक्षा मिळेल.", असे भाजप आमदार बसनगौडा पाटील म्हणाले. केरळवासियांनी भाजप आमदाराच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. द्वेष पसरवण्यासाठी भाजप आमदार अशी विधाने करत असून, केरळमध्ये हा अजेंडा चालणार नाही, अशा तीव्र प्रतिक्रिया केरळमधील जनतेने व्यक्त केल्या आहेत. याआधी हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांनीही एका वृत्तवाहिनीशी बातचित करताना म्हटले होते, "केरळमधील नैसर्गिक संकट गोहत्या, गोमांस खाणं आणि देवी-देवतांचा अपमान करणं, यांमुळे आले आहे. हिंदूंच्या भावनांशी खेळल्यामुळेच केरळमध्ये महापुराची घटना घडली."