नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी निवडणुकीच्या माध्यमातूनच पक्षाच्या अध्यक्षपदी विराजमान होऊ इच्छित आहेत. त्यात सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष लोकशाही पद्धतीने निवडला जावा, या मताचे स्वत: राहुल गांधी आहेत. त्यामुळे आता चर्चा सुरु झाली आहे की राहुल गांधींविरोधात अध्यक्षपदासाठी कोण निवडणूक लढवणार?  


आजवर अनेक नेत्यांनी काँग्रेसला राम राम ठोकताना राहुल गांधी यांच्या नेतृत्त्व क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेल्या बरखा शुक्ला यांनी तर म्हटलं होतं की, "राहुल गांधींना पक्ष चालवता येत नाही. त्यामुळे त्यांनी पदावरुन बाजूला झालं पाहिजे."

विशेष म्हणजे काँग्रेस सोडून इतर पक्षात जाणाऱ्यांनीच नव्हे, तर पक्षातीलही काही महत्त्वाच्या नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्त्वाबाबत शंका उपस्थित केली आहे. प्रिया दत्त, संदीप दीक्षित यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्त्वावर अप्रत्यक्षरित्या प्रश्न उपस्थित केले आहेत.

काँग्रेस वर्किंग कमिटीने राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावं, असा प्रस्ताव दिल्यानंतरही, राहुल यांना वाटतं की, अध्यक्ष निवडणुकीच्या माध्यमातूनच निवडला जावा आणि त्यात विजयी झाल्यासच अध्यक्ष व्हावं.

आता काँग्रेससह संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे की, राहुल गांधी यांच्याविरोधात अध्यक्षपदासाठी कोण निवडणूक लढवणार?

सूत्रांच्या माहितीनुसार, स्वत: राहुल गांधी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेत्यांना  अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याबाबत आवाहन करण्याचीही शक्यता आहे. आता हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की, कोणता नेता राहुल गांधींविरोधात मैदानात उतरतो. शिवाय, राहुल गांधींच्या या भूमिकेवर सोनिया गांधी आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात, हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.