नवी दिल्ली : बनावट पासपोर्ट प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने कालच (सोमवार) छोटा राजनसह चौघांना दोषी ठरवलं. दोषी ठरवलेले इतर तिघे हे पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी आहेत.
70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिलं प्रकरण असेल, ज्यावर कोर्टाने त्याला शिक्षा सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
सप्टेंबर 2003 मध्ये मोहन कुमार नावावर बनलेल्या बनावट पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसावर छोटा राजनने भारतातून ऑस्ट्रेलियात पळ काढला होता. यानंतर तिथे तो सुमारे 12 वर्ष राहिला.
राजनसह चौघांवर आरोप कोणते?
बनावट पासपोर्ट प्रकरणात पटियाला हाऊस कोर्टाने चौघांविरोधात भारतीय दंडविधान कलम 420, 468, 471, 120बी, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत आरोप निश्चित केले आहेत.
सीबीआयने पहिलं आरोपपत्र फेब्रुवारी 2016 मध्ये कोर्टात दाखल केलं होतं. यामध्ये छोटा राजनसह बंगळुरुच्या तीन निवृत्त अधिकाऱ्यांच्याही नावाचा उल्लेख केला होता.
सीबीआयनुसार, आरोपपत्रात चारही आरोपींचा फसवणूक, षडयंत्र रचणं आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत उल्लेख केला आहे.
राजनला बालीमध्ये अटक
ऑक्टोबर 2015 मध्ये जेव्हा छोटा राजन ऑस्ट्रेलियाहून इंडोनेशियाला पोहोचला, तेव्हा इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. इंडोनेशियन पोलिसांनी त्याला बालीमध्ये अटक केली. त्यानंतर नोव्हेंबर 2015 मध्ये त्याला भारताकडे सोपवलं.
राजन तिहार जेलमध्ये कैद
छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैद आहे. त्याची सुरक्षा लक्षात घेऊन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी केली जाते.
संबंधित बातमी
बनावट पासपोर्ट प्रकरण : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चौघे दोषी