नवी दिल्ली : अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आता 25 वर्षे झाली आहेत. पण आजही या प्रकरणाचा निकाल आलेला नाही. बाबरी मशीद पाडण्यामागे कट होता की, जनप्रक्षोभ यावर आजही अनेकजण वेगवेगळी मतं मांडतात. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणी भाजप आणि संघ परिवारातील अनेक ज्येष्ठ नेत्यांविरोधात खटला चालवण्यात येणार आहे. आता या प्रकरणी मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. वादग्रस्त वास्तू पाडण्यासाठी कारसेवकांना प्रशिक्षण दिल्याचा गौप्यस्फोट तत्कालिन उत्तर प्रदेश शिवसेना प्रदेशाध्यक्ष पवन पांडे यांनी एबीपी न्यूजकडे केला आहे.

पांडे यांना याप्रकरणी प्रमुख आरोपी असून याबाबत एबीपी माझाला सांगितलं की, “ जेव्हा बाबरी मशीद पाडली जात होती, तेव्हा काही लोक माईकवरुन कारसेवकांना थांबवत होते. त्यावेळी मी मशीदीजवळच होते. पण जेव्हा वादग्रस्त वास्तूचा काही भाग कोसळला, त्यावेळी त्याच माईकवरुन ‘एक धक्का और दो बाबरी मशीद तोड दो’च्या घोषणा देण्यात आल्या. यात उमा भारतींचा आवाज आम्ही ऐकला होता.’’

बाबरी मशीद पाडल्याला भाजप आणि विश्व हिंदू परिषदेनं सातत्यानं नाकारलं आहे. तसेच ती घटना जनप्रक्षोभातून घडल्याचा दावा भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी केला आहे. पण पवन पांडेंनी बाबरी मशीद पाडण्याची घटना पूर्वनियोजित असल्याचा गौप्यस्पोट केला आहे. यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाची सर्वांना पूर्वकल्पना होती, असंही पवन पांडेंचं म्हणणं आहे.

पांडे म्हणाले की, “मशीद पाडण्यापूर्वी 500 मीटर अंतरावरच प्रतिकात्मक कारसेवा करायची असल्याचं सांगण्यात येत होतं. पण जेव्हा जनक्षोभ उफाळून आला, त्यावेळी प्रशिक्षित कारसेवकांनी मागच्या बाजूनं मशीदीचा ताबा घेतला. मीही त्या आंदोलनात सहभागी असल्याने, त्यावेळी मी मशीदीजवळच होतो,”

मशीद पाडण्याच्या घटनेचं वर्णन करताना पांडे पुढं म्हणाले की, आधीच ठरल्यानुसार, कारसेवकपुरमध्ये जमा केलेली हत्यारे मशीदीपर्यंत पोहचवण्यात आली होती. 6 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी मशीदीचा पहिला घुमट पाडण्यात आला. यानंतर तीनच तासात उरलेला सर्व भाग जमीनदोस्त करण्यात आला. यावेळी मीर बाकीच्या शिलापटाचे तीन तुकडे झाले होते. यातील दोन तुकडे आणण्यात आम्हाला यश आलं. पण एक तुकडा तिथेच राहिला. यातील दोन तुकड्यांचा भाग आजूनही आमच्याकडे असून वेळ आल्यावर कोर्टासमोर तो सादर केला जाईल. या तुकड्यांचा फोटो विविध वृत्तपत्र, आणि साप्ताहिकांमध्ये प्रकाशित झाले आहेत. त्यानुसारच सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात मलाही आरोपी बनवलं आहे.”

बाबरी मशीद पाडण्याचा सुनियोजित कट रचण्यात असल्याचा सांगून पांडे म्हणाले की, “मशीद पाडण्यासाठी यासाठी काहीजणांना प्रशिक्षण दिलं होतं. 1991 ते 1992 दरम्यान महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. मला चित्रकुट पर्वत रांगांमधील कामद गिरीपर्वतावर प्रशिक्षण दिलं होतं. यात डोंगर चढणे आणि लहान हत्यारांचा वापर करुन दगड फोडणे आदी प्रशिक्षण देण्यात येत होतं.”

याबाबत अडवाणींना माहिती होती का? या प्रश्नावर पांडे म्हणाले की, “लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, विनय कटियार यांना बैठकांमध्ये याची माहिती होती. जवळपास दीड हजार लोकांना वादग्रस्त वास्तू पाडण्याचं प्रशिक्षण दिल्याचं तत्कालिन शिवसेना खासदार मोरेश्वर सावे यांनी अडवाणी आणि इतर नेत्यांना सांगितलं होतं.”

दरम्यान, सीबीआयनं दाखल केलेल्या आरोपपत्रात अडवणींना बाबरी मशीद पाडण्यासाठी मुख्य सूत्रधार ठरवण्यात आलं आहे. पण अडवाणींनी सीबीआयचे सर्व आरोप नेहमीच फेटाळून लावले आहेत. बाबरी मशीद पाडण्यासाठी कोणताही कट रचला नसल्याचं सातत्यानं अडवाणींनी सांगत आहेत. पण अडवाणींना सर्व माहित असूनही ते नकार का देत आहेत असा प्रश्न पांडे यांनी उपस्थित केला आहे.

कोण आहेत पवन पांडे?

अयोध्या जन्मभूमी आंदोलनानं संपूर्ण देशभरात वातावरण तापलेलं होतं. त्यावेळी पवन पांडे उत्तर प्रदेश शिवसेना अध्यक्ष होते. 1986 साली त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. विशेष म्हणजे, बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना उद्धव आणि राज ठाकरे यांच्याप्रमाणे मुलगा मानत असल्याचं पांडेंचं म्हणणं आहे.

1989 मध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते आयोध्या रथयात्रा काढली, त्यावेळी पांडेही या यात्रेत सहभागी झाले होते. याच दरम्यान, त्यांचा संपर्क राम मंदिर आंदोलनाचे प्रमुख संत आणि तत्कालिन श्रीरामजन्मभूमी न्यासचे अध्यक्ष रामचंद्र परमहंस यांच्याशी आला. वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर जवळपास 17 वेळा या दोघांनाही एकाच कारागृहात ठेवण्यात आल्याचं पांडेंनी सांगितलं.

काय म्हणाले पवन पांडे?


संबंधित बातम्या

बाबरी मशीद : मुरली मनोहर जोशी आणि सरसंघचालकांची भेट

बाबरी प्रकरणातील आरोपींचं ‘पद्मविभूषण’ काढणार का? : ओवेसी

आज रात्रीच अयोध्येला जाणार : उमा भारती

बाबरी मशीद : अडवाणी, जोशी, भारतींवर कट रचल्याचा खटला!

अडवाणी, उमा भारती आणि कल्याण सिंह यांचं पुढे काय?