नवी दिल्ली : देशाचा नवा राष्ट्रपती कोण बनणार? देशाच्या राजधानीत सध्या या एकाच विषयाची गरमागरम चर्चा सुरु झाली आहे. मंत्रिमंडळ निवड असो की यूपीचा मुख्यमंत्री, मोदी-शहा जोडीनं आजवर भल्याभल्यांचे अंदाज चुकवत आश्चर्याचा धक्का देण्याचं काम केलंलं आहे. ती परंपरा याही निवडीत कायम राहणार का याचीही उत्सुकता आहे. या चर्चेत नेमकी कुणाची नावं आघाडीवर आहेत आणि ती का आहेत याविषयी विशेष रिपोर्ट :

अवघ्या तीन महिन्यांत देशाला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. कुणाला मिळणार हे सर्वोच्च पद? मोदी-शहांची जोडी कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करणार? निवडणूक जुलैमध्ये होणार असली, तरी त्यादृष्टीनं खलबतं मात्र आतापासूनच सुरु झालेली आहेत. यूपीसह पाच राज्यांच्या निवडणुकांत घवघवीत यश मिळवल्यानंतर भाजपला आपल्या पसंतीचा राष्ट्रपती निवडण्यात फारशा अडचणी नाहीत.

मंत्रिमंडळाची निवड असो की राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची ज्या पद्धतीनं सारे अंदाज उधळून लावत मोदी-शहा नेमणुका करत आले आहेत, ते बघता राष्ट्रपतीपदाबद्दल ठाम अंदाज वर्तवण्याचं धाडस कुणीच करणार नाही. भाजपवालेही याबद्दल अनभिज्ञच आहेत. ही निवड सर्वस्वी मोदींच्या मनावर, अमित शहांच्या सल्ल्यांवर आणि सरसंघचालकांच्या मर्जीवर अवलंबून असेल. पण तरीही जी नावं चर्चेतून समोर येतायत ती इंटरेस्टिंग आहेत.

द्रौपदी मुर्मू

राष्ट्रपतीपदाच्या चर्चेत सध्या आघाडीवर असलेलं नाव आहे. झारखंडच्या राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांचं. या नावावर शिक्कामोर्तब झालं तर देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती आम्ही दिल्याचा डंका भाजपला पिटता येईल.

दलित, ओबीसींना आपल्याकडे खेचल्यानंतर आदिवासी हा एकच वर्ग आहे, जो अजूनही काँग्रेसकडे बऱ्यापैकी टिकून आहे. शिवाय सध्या ज्या ओदिशात भाजप सत्तेची स्वप्नं पाहतं आहे, त्याच ओदिशातल्या द्रौपदी मूर्मू आहेत. 2007 मध्ये ओदिशा विधानसभेत त्यांना सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून सन्मानित करण्यात आलं होतं. त्यांच्या निवडीनं ओदिशी अस्मितेला हाक देत भाजपला पाय रोवणं सोपं जाऊ शकतं.

थावरचंद गहलोत

भाजपचा दलित चेहरा म्हणून थावरचंद गहलोत यांचंही नाव या रेसमध्ये घेतलं जातं. यूपीच्या निवडणूकीत भाजपला दलित वर्गाची मोठी साथ मिळालीय. थावरचंद गहलोत यांच्या निवडीनं भाजप या प्रेमाची जबरदस्त परतफेड करु शकते. पण सध्या सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असलेल्या गहलोतांना अजून तरी म्हणावा तसा प्रभाव पाडता आलेला नाही.

लालकृष्ण अडवाणी

2014 मध्ये मोदींची सत्ता आल्यापासून भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना आशा आहे की अडवाणीच राष्ट्रपती व्हावेत. पण मोदी आणि अडवाणी यांचे सध्याचे संबंध बघता हे प्रत्यक्षात उतरेल की नाही याबद्दल शंका आहे. शिवाय राष्ट्रपती निवडणुका जवळ आल्या असतानाच तिकडे बाबरी मशीदीप्रकरणी कोर्टातली केसही वेगानं कशी फिरु लागलीय याबद्दलही दिल्लीत कुजबूज सुरु आहे.

सुमित्रा महाजन

राष्ट्रपतीपदासाठी महिला उमेदवारच द्यायचं ठरवलं तर त्यासाठी सर्वात आघाडीवर असलेलं नाव म्हणजे लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांचं. इंदूरमधून आठवेळा खासदार असलेल्या सुमित्राताई या मूळच्या महाराष्ट्राच्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं पाठबळ हा त्यांचा प्लस पॉईंट. शिवाय त्यांच्या उमेदवारीचा एक फायदा म्हणजे मराठी अस्मितेमुळे शिवसेना या नावाला विरोध करण्याची शक्यता कमी. याआधी दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेनं एनडीएच्या विरोधात जाऊन आपल्या पसंतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे. पण सुमित्राताईंचं नाव पुढे केल्यास शिवसेनेला आपोआपच शह बसेल.

अमिताभ बच्चन

वाजपेयींच्या काळात एनडीएनं कलामांसारखा बिगरराजकारणी राष्ट्रपती देशाला दिलेला होता. मोदींनीही तसा साच्यापलीकडचा विचार केलाच तर त्यादृष्टीनंही काही नावं चर्चेत आहेत. अमिताभ बच्चन सध्या जवळपास प्रत्येक सरकारी जाहिरातीत दिसतात. शिवाय गुजरात टुरिझमपासूनच मोदींशी त्यांचं कनेक्शन. शिवाय बच्चन यांना राष्ट्रपती करणं म्हणजे गांधी घराण्यावर सूड उगवण्यासारखंच आहे. त्यामुळे बच्चन यांचंही नाव या चर्चेत अधूनमधून येत असतं.

नारायण मूर्ती, रतन टाटा

इन्फोसिसचे नारायणमूर्ती, उद्योगपती रतन टाटा ही नावंही काहीजण घेतात. त्यासाठी टाटा आणि मोहन भागवतांच्या नागपुरातल्या चर्चेचाही दाखला दिला जातो. पण अर्थात या सगळ्या चर्चाच आहेत. मोदींची कार्यशैली पाहता नवा राष्ट्रपती कोण असणार याचा सस्पेन्स इतक्यात संपणारा नाही. जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसा तो वाढत जाईल.