नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकील्या पराभवानंतर कॉंग्रेस पक्ष नेमक्या कुठल्या दिशेनं जाणार हे अजूनही ठरलेलं नाही. राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतल्यानंतर नवीन अध्यक्ष नेमका कोण होणार याचा सस्पेन्स अजूनही संपायला तयार नाही.
राहुल गांधी नाही तर मग अध्यक्ष कोण? या एका प्रश्नाचं उत्तर गेल्या महिनाभरापासून काँग्रेस पक्षाला सापडत नाहीये. 25 मे रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत राहुल गांधींनी राजीनामा दिला. त्यानंतर आत्तापर्यंत हा पक्ष केवळ चाचपडताना दिसतोय. सुरुवातीला राहुल गांधी पक्षातल्या नेत्यांना भेटायलाही तयार नव्हते. आता ते भेटत आहेत. बैठका करत आहेत. पण तरीही राजीनाम्याच्या निर्णयावर मात्र ते ठाम आहेत.
आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राहुल गांधींनी बैठक केली. या बैठकीच्या निमित्तानं सर्व मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशीही विनंती केली आहे. पण या दबावाला राहुल गांधी बळी पडण्याची शक्यता कमी आहे. कुठल्याही परिस्थितीत ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत असं त्यांच्या वर्तुळातले काही नेते सांगत आहेत.
दरम्यान, आजच्या बैठकीनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी बैठकीत चांगली चर्चा झाल्याचे सांगितले. कार्यकर्त्यांच्या भावना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचविल्या आहेत. निवडणुकांमध्ये जय-पराजय होतच असतात. राहुल गांधी योग्य निर्णय घेतील, असेही गहलोत म्हणाले.
एकीकडे राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याचं सत्र सुरु झालं आहे. नाना पटोले यांनी अखिल भारतीय किसान काँग्रेस सभेचा राजीनामा दिला, नितीन राऊत यांनीही अनुसुचित जाती सेलच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. इतरही काही पदाधिकारी राजीनामे देत आहेत. तर दुसरीकडे काहींनी आज काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेरच उपोषण सुरु केलं. राहुल यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं हे सांगून आपली निष्ठा दाखवण्यासाठी जणू स्पर्धाच सुरु आहे.
दरम्यानच्या काळात अध्यक्षपदासाठी अनेक नावंही मीडियात येऊन गेली. कधी अशोक गहलोत, कधी पृथ्वीराज चव्हाण, तर कधी सुशीलकुमार शिंदे यांचं. पण अजून तरी कुठल्या नावावर एकमत झालं नसल्याचंच कळत आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुका आता अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पेच तातडीनं सुटणं आवश्यक आहे.
काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण? सस्पेन्स संपेना, राहुल गांधींसाठी निष्ठावानांकडून प्रयत्न सुरुच
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jul 2019 08:41 PM (IST)
आज काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत राहुल गांधींनी बैठक केली. या बैठकीच्या निमित्तानं सर्व मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी यांनीच अध्यक्षपदावर कायम राहावं अशीही विनंती केली आहे. पण या दबावाला राहुल गांधी बळी पडण्याची शक्यता कमी आहे. कुठल्याही परिस्थितीत ते आपला निर्णय मागे घेणार नाहीत असं त्यांच्या वर्तुळातले काही नेते सांगत आहेत.
Getty Images)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -