नवी दिल्ली : बंदुकीच्या धाकाने तिघा जणांनी एका कुटुंबाला लुटल्याचा प्रकार राजधानी दिल्लीत समोर आला आहे. पहाटे तीन वाजता दोन लहान मुलांसह घरी परतणाऱ्या जोडप्याच्या कारचा आरोपींनी पाठलाग केला. अखेर पार्किंगमध्ये शिरुन त्यांनी केलेल्या लुटीचा थरार घराबाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.


मॉडेल टाऊन परिसरात राहणाऱ्या वरुण बहल यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. वरुण आपली पत्नी आणि दोन मुलांसह रविवारी पहाटेच्या सुमारास सासुरवाडीहून परत येत होते. घराबाहेर त्यांनी तोंड झाकलेल्या तिघा बंदुकधारींना पाहिलं. त्यामुळे घरात शिरण्याऐवजी त्यांनी आपली मर्सिडीज कार पुढे नेली.

घराचे मुख्य गेट सताड उघडे असल्यामुळे त्यांनी गाडी पुन्हा आपल्या घराच्या दिशेने वळवली. कार पार्क करुन वरुण घाईघाईत मुख्य गेट बंद करण्यासाठी धावले, मात्र तेवढ्यात शिताफीने तिन्ही आरोपींनी गेटमधून आत शिरकाव केला. त्यानंतर घडलेला प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.


लुटारुंनी वरुण यांच्याकडे पैशांचं पाकिट आणि सोन्याचं ब्रेसलेट मागितलं. हा प्रकार बघून पत्नी फोन करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मात्र तितक्यात एक जण त्यांच्या पत्नीकडे जाऊन कारमध्ये चाचपडू लागला. पत्नीकडे त्यांनी गळ्यातले, कानातले असल्यास काढून देण्यास सांगितलं, मात्र ते त्यांच्याकडे नव्हते. तर त्यांनी पर्स सीटखाली लपवल्यामुळे ती वाचली. अखेर फोन हिसकावून आरोपी पसार झाला. यावेळी, पत्नीने तिच्या मांडीवर असलेल्या चिमुकलीला घट्ट कवटाळलं, तर त्यांचं दुसरं मूल मागच्या सीटवर झोपलं होतं.

पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला असला, तरी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. दिल्लीत यापूर्वीही लुटीच्या अनेक घटना घडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी वारंवार प्रश्न उपस्थित होत आहेत.