नवी दिल्ली : भाजपने उत्तर प्रदेशात दणदणीत यश मिळवल्यानंतर आता 2019 च्या लोकसभा निवडणुकांची चर्चा रंगली आहे. या निवडणुकीला अजून अडीच वर्षे कालावधी आहे. मात्र उत्तर प्रदेशातील परिस्थितीनंतर इतर पक्ष 2019 च्या तयारीला लागले आहेत.
भाजपनेही 2014 पेक्षा यावेळी जास्त जागा निवडून येतील, असा दावा केला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशच्या विजयानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करण्याचं आव्हान भाजपसमोर असेल.
भाजपने 2014 मध्ये लोकसभेच्या 543 जागांपैकी 282 जागांवर विजय मिळवला होता. मित्रपक्षांसोबत मिळून भाजपने 336 जागांवर विजय मिळवला. यामध्ये उत्तर प्रदेशचीही महत्वाची भूमिका होती. उत्तर प्रदेशच्या 80 पैकी 73 जागांवर एनडीएला यश मिळालं होतं.
2019 मध्ये विरोधी पक्ष कोण?
मोदी लाटेवर सवार होत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये घवघवीत यश मिळवलं. त्यामुळे आता 2019 मध्ये मोदी लाटेला रोखणारा प्रमुख विरोधी पक्ष कोणता असेल, याबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.
मोदींना रोखण्यासाठी काँग्रेसकडून राहुल गांधी तर असतीलच. पण त्यांच्याशिवायही अनेक नावं चर्चेत आहेत. जेडीयू पक्षाचे समर्थक नितीश कुमार पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील, असा दावा करतात. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असतील, असं बोललं जातं.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीअगोदर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवही पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची चर्चा होती. मात्र उत्तर प्रदेशच्या निकालाने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवाय नॅशनल कॉन्फरन्सचे नेता आणि माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही विरोधकांनी 2019 विसरुन 2024 च्या तयारीला लागावं, असा सल्ला दिला होता.
नितीश कुमारांच्या नावाची चर्चा
काँग्रेस वगळता इतर विरोधी पक्षांमध्ये बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. नितीश कुमार यांच्या नावावर केजरिवाल, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, नवीन पटनायक, देवगौडा यांच्यासारखे स्थानिक पक्ष एकत्र येऊ शकतात, असंही बोललं जातं.
उत्तर प्रदेशमध्ये बिहार प्रमाणे महायुती न झाल्यानेच पराभव झाला, असं मतही जेडीयूने व्यक्त केलं आहे. त्यामुळे जेडीयू इतर पक्षांची मोट बांधण्याच्या प्रयत्नात असेल.
मोदींना रोखण्यासाठी नितीश कुमार यांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करुन विविध राज्यातील छोटे पक्ष एकजुटीची मोट बांधू शकतात. मात्र काँग्रेस या पक्षांसोबत जाण्यास उत्सुक नसेल, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. कारण काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वात निवडणूक लढवण्यास सज्ज असेल, असं बोललं जातं.