अहमदाबाद : आफ्रिकेपाठोपाठ ‘झिका’ विषाणूचा आता भारतातही शिरकाव झाला आहे. देशात पहिल्यांदाच झिका विषाणूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे हे तीनही रुग्ण अहमदाबादमधील बापूनगर परिसरातील आहेत. यामध्ये एका गर्भवती महिलेचाही समावेश आहे. या महिलेची जानेवारी महिन्यात चाचणी घेतली होती.
भारतातही झिका विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य मंत्रालयाने आपल्या वेबसाईटवर बापूनगर येथील या तिन्ही रुग्णांना झिका विषाणूची लागण झाल्याचे म्हटले आहे.
झिका विषाणूची लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनेही केले आहे. डासांना रोखण्यासाठी उपाय केल्यास झिका विषाणू रोखला जाऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. विशेषत: गरोदर महिलांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.