नवी दिल्ली : नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या विमानातून उतरवण्यात आलेल्या बॉक्समध्ये 15 कोटी नव्हे तर आंबे असल्याची माहिती केंद्रीय मंत्री आणि धुळ्याचे भाजप उमेदवार सुभाष भामरे यांनी दिली आहे. या बॉक्समध्ये 15 कोटी रुपये असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला होता.

सुरेश प्रभू हे कोकणातून धुळ्याला आपल्या नातेवाईकांकडे जात होते. त्यावेळी त्यांनी ही पेटी विमानातून आणली. या पेटीत 15 कोटी रुपये असल्याचा खोटा व्हीडिओ सोशल मीडियावर वायरल होत असल्याचं भामरे म्हणाले.

सुरेश प्रभू यांच्या विमानातून एक मोठा पांढरा बॉक्स उतरवतानाचा व्हीडिओ समोर आला होत. या बॉक्समधून धुळे लोकसभा मतदारसंघासाठी पैसा आणल्याचं बोललं जात होतं.

VIDEO | सुरेश प्रभू यांच्या विमानातील पांढऱ्या बॉक्समध्ये काय? | एबीपी माझा



या बॉक्सबद्दल सुरेश प्रभूंना विचारलं असता त्यांनी थेट डोक्यावर हात मारला होता. इतकंच नाही, तर आपल्याकडे 15 रुपये देखील नाहीत, तुम्ही 15 कोटीचं काय बोलता? असा मिष्किल सवालही त्यांनी उलट विचारला.

दरम्यान, कर्नाटकातल्या चित्रदुर्गमध्ये नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरमधूनही असाच एक बॉक्स उतरवण्यात आला होता. यासंदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रारही केलेली आहे.