पटियाला : पंजाबमधील पटियाला राजघराण्यातील राजकन्या सहरइंदर कौर प्रचारात उतरली आहे. आजोबा कॅप्टन अमरिंदर यांच्या प्रचारासाठी सहरइंदर मैदानात उतरली आहे. अमरिंदर सिंह हे काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आहेत.


पंजाबमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडताना दिसतो आहे. या राजकारणाच्या धुरळ्यात पंजाबमधील राजघराण्यातील 21 वर्षीय राजकन्या सहरइंदर कौरही उतरली आहे. प्रचाराच्या निमित्ताने सहरइंदरने एकप्रकारे आपल्या राजकारणातलं पहिलं पाऊल टाकलं आहे.

स्वत: राजकारणात नवीन असले, तरी निवडणूक प्राचारातून खूप काही शिकायला मिळतं आहे, असे सहरइंदरने माध्यमांशी बोलताना सांगितले. विशेष म्हणजे पंजाबच्या विकास कशाप्रकारे करता येऊ शकतो, याचा प्लॅनही सहरइंदरकडे आहे.

सहइंदर कौर कोण आहे?

सहरइंदर कौर ही कॅप्टन अरिंदर सिंह यांचे पुत्र रणइंदर सिंह यांची कन्या आहे. 21 वर्षीय सहरइंदर कोडईकनाल स्कूलमध्ये शिकली असून, दोन वर्षांपासून ती आजोबांपासून राजकारणाचे धडे घेत आहे. पॅरिसमधील इंटरनॅशनल फॅशन अकॅडेमीत सहरइंदरने प्रवेश घेतला असून, आर्ट अँड मार्केटिंगमध्ये ती तिथे शिक्षण घेणार आहे.

सहरइंदर कौर जेव्हा प्रचारासाठी बाहेर पडते, त्यावेळी पारंपारिक वेशभूषा परिधान करते. लोकांना हात जोडून नमस्कार करत एखाद्या राजकीय नेत्यांप्रमाणेच भाषण देते.

राजकारणात प्रवेश करण्याचा प्रश्न सहरइंदर फेटाळत नाही, मात्र सध्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचं तिने ठरवलं आहे. सहरइंदरला पंजाबमध्ये नावाने हाक न मारता 'राजकुमारी' असंच म्हटलं जातं.