नवी दिल्ली : अगदी दोन-एक दिवसांपूर्वीच मेनका गांधी यांनी लखनौतील एका बैठकीत आपल्या जाऊबाई सोनिया गांधी यांची स्तुती केली असतानाच, आता राहुल गांधी आणि वरुण गांधी यांच्यातही असंच काहीसं घडलं आहे.


 

देशाच्या राजकारणात गांधी कुटुंबं कायमच महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आजही गांधी कुटुंबातील सदस्य राष्ट्रीय राजकारणात सक्रीय आहेत. मात्र, आता गांधी कुटुंब विस्कटलंय. कुणी भाजपमध्ये, तर कुणी काँग्रेसमध्ये.

 

एकीकडे सोनिया-राहुल-प्रयंका आणि दुसरीकडे मेनका-वरुण, अशी विभागणी गांधी कुटुंबीयांची झालीय. या कुटुंबातील वाद जगजाहीर आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून असे काही घडू लागलं आहे की, गांधी कुटुंबातील कटुता संपलीय का, असा प्रश्न पडावा.

 

मात्र, असे अनेकदा दिसून आले आहे की, संवाद वाढवण्यासाठी आणि कटुता कमी करण्यासाठी दोन्हीकडून सकारात्मक पावलं उचलली गेली आहेत. म्हणजे उदाहरणादाखल सांगायचं, तर वरुण गांधी यांना आपल्या लग्नाचं निमंत्रण देण्यासाठी थेट सोनिया गांधींचं घर गाठलं.

 

असाच एक प्रसंग कालही पाहायला मिळाल. एकाच देशात राहून, आपणं वेगवेगळ्या देशात राहत असल्यासारकं एकमेकांशी वागणं, हे राहुल आणि वरुण यांच्यातून स्पष्ट दिसून येतं. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाच्या एका संसदीय समितीत राहुल आणि वरुण एकत्र आहेत. विशेष म्हणजे या समितीच्या बैठकीत दोघेही एकमेकांशी अनेकदा सहमतही झाले.

 

सूत्रांच्या माहितीनुसार, परराष्ट्र मंत्रालयाच्या या समितीच्या बैठकीत असे अनेक मुद्दे होते, ज्यावेळी वरुण गांधी यांनी राहुल गांधींशी सहमती दर्शवली, तर राहुल गांधी यांनी वरुण गांधींशी सहमती दर्शवली. दोघांमधील हा सुसंवाद उपस्थितांना आश्चर्याचा धक्का होता.

 

जेव्हा ‘एबीपी न्यूज’ने राहुल गांधींशी याबाबत बातचित केली, त्यावेळी राहुल म्हणाले, “आम्हा दोघेही तिथे एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र आलो होते.”

 

आता राहुल गांधी यांनी वरुण गांधींसोबतच्या सुसंवादाला भले औपचारिकतेचं लेबल लावलं असेल, मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते, या दोन्ही भावांमधील असे किस्से कायमच चर्चेचा विषय बनतात. कारण या दोघांच्याही कुटुंबाचं भारतीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे.