नवी दिल्ली : मेडिकलसाठी प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळू शकलेला नाही. कारण NEET ही प्रवेश परीक्षा ठरलेल्या वेळेनुसारच होईल असं कोर्टानं आज स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता ठरल्यानुसार 1 मे आणि 24 जुलै अशा दोन टप्प्यांत ही परीक्षा पार पडणार आहे.


 

अवघ्या दोन दिवस आधी अशा पद्धतीचा निर्णय आल्यानं विद्यार्थी आणि पालकांची मात्र घाबरगुंडी उडाली आहे.

 

संपूर्ण देशभरात मेडिकलच्या प्रवेशासाठी एकच परीक्षा होईल, असा निर्णय दोन आठवड्यांपूर्वी सुप्रीम कोर्टानं दिलेला होता. त्यानंतर हा निर्णय नेमका कधीपासून अंमलात येणार याची चर्चा सुरु होती. कालच सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानं हे स्पष्ट केलं की, ही अंमलबजावणी यंदापासूनच होणार आहे. दुपारी हा निर्णय आला आणि अवघे दोन ते तीन दिवस शिल्लक असल्यानं विद्यार्थी, पालक सगळ्यांची घाबरगुंडी उडाली. आज अनेकांनी त्याविरोधात याचिकाही दाखल केली.

 

एकच प्रवेश परीक्षा घ्यायची असली, तरी ती मग दोन टप्प्यांत न घेता 24 जुलैलाच घ्यावी, जेणेकरुन विद्यार्थ्यांना तयारीसाठी थोडा तरी वेळ मिळेल असं काहींचं म्हणणं होतं. कारण राज्यांची प्रवेश परीक्षा आणि सीबीएसईकडून घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा यात अभ्यासक्रमाचाही बदल आहे.

 

काल निर्णय आल्यानंतर केंद्र सरकारनं याचं स्वागत केलं होतं. मात्र, आज यू टर्न घेत एवढ्या कमी वेळात अशी परीक्षा घेणं अत्यंत अवघड असल्याचं आज केंद्रानं कोर्टात म्हटलं.

 

मात्र, हा निकाल आम्ही सगळ्या पक्षांची बाजू ऐकल्यावरच दिलेला आहे. आता परत तो तपासून पाहण्याची गरज नाही. परीक्षा वेळेवरच होऊ द्या असं सांगत सुप्रीम कोर्टानं या प्रकरणी सुनावणी करण्यास नकार दिला.

 

दरम्यान, महाराष्ट्र सरकार या प्रकरणात सोमवारी म्हणजे 2 मे रोजी पुनर्विचार याचिका दाखल करण्यात असल्याची माहिती मिळते आहे. 1 मेची परीक्षा झाल्यानंतर ही याचिका दाखल होणार आहे. मात्र, राज्याची MH-CET ही परीक्षा यंदापुरता ग्राह्य धरावी, यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार आहे. त्या याचिकेवर कोर्ट काय प्रतिसाद देतं यावर विद्यार्थ्यांची शेवटची आशा अवलंबून आहे. आता मेडिकलच्या परीक्षेचं वेळापत्रक काय असेल.

 

सरकारच्या MH-CET चं नेमकं काय होणार?

 

महाराष्ट्र सरकारची एमएच-सीईटी 5 मे रोजी होणार आहे. सोमवारी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सरकारच्या विरोधात गेला, तर या परीक्षेचं महत्व उरणार नाही.