नवी दिल्ली : नोटाबंदीला 50 दिवस पूर्ण होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. मात्र एटीएमसमोर लागलेल्या रांगा कमी कधी होणार, आणि नियमित पैसे काढण्याची मर्यादा कधी संपणार, हा सर्वांना पडलेला मोठा प्रश्न आहे.


एटीएममधून सध्या दररोज 2500 रुपये काढता येतात. एटीएममधून नागरिकांना गरजेप्रमाणे पैसे काढता आले, तर स्वाभाविकपणे एटीएमसमोरच्या रांगाही संपतील. मात्र एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा संपण्यासाठी संपूर्ण जानेवारी महिना जाऊ शकतो, असा अंदाज देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने वर्तवला आहे.

एटीएमबाहेर रांगा दिसणं सध्या सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र एसबीआयने या गर्दीवर तोडगा काढण्यासाठी एक अंदाज बांधला आहे. नोटा छापणाऱ्या आणि ग्राहकांना पैसे देणाऱ्या रिझर्व बँक ऑफ इंडियाचा गेल्या सहा वर्षांचा डेटा एसबीआयने जमा केला आहे.

एसबीआयचा अंदाज...

एका व्यक्तीला एका महिन्याला किमान किती पैसे लागतात, याचा अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या माहितीतून एसबीआय बांधणार आहे.

आकडेवारीनुसार एक व्यक्ती सरासरी 3 हजार 143 रुपये महिन्याला काढतो. म्हणजेच एका व्यक्तीला दररोजच्या सरासरी हिशोबाने 103 रुपये लागतात.

देशात सध्या 77 कोटी एटीएम कार्ड आहेत.

म्हणजेच सध्या देशात दररोज 8 हजार कोटी रुपयांची गरज आहे.

एवढी रक्कम दररोज एटीएममध्ये उपलब्ध असेल तरच रांगा लागणं बंद होईल.

देशात एकूण 2 लाख 16 हजार 216 एटीएम मशिन्स आहेत. म्हणजेच प्रत्येक एटीएमला दररोज 3 लाख 70 हजार रुपयांची गरज आहे.

किमान जानेवारीपर्यंत सरकार अडीच हजार रुपये काढण्याची मर्यादा हटवणार नाही, असा एसबीआयचा अंदाज आहे.