मुंबई : देशातील हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकांचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला आहे. त्यामध्ये, हरियाणात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत सरकार स्थापन केलं. त्यामुळे, हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी भाजपच्या नायबसिंग सैनी यांनी शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रमुख उपस्थितीत हरियाणात हा शपथविधी सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार यांनीही उपस्थिती दर्शवली होती. या हरियाणा दौऱ्यातील एक चांगली आठवण आणि फोटो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना, त्यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री फेलोशीप योजनेत निवड झालेल्या विद्यार्थी फेलोने पुढे जाऊन युपीएससी (UPSC) परीक्षा पास केली. सध्या ते हरियाणामध्ये सहायक आयुक्त पदावर कार्यरत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन फोटो शेअर करत ही प्रेरणादायी आठवण सांगितलीय.
दीपक करवा हे सध्या हरियाणातील जींद जिल्ह्यात महापालिकेचे सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. दीपक हे मूळ राजधानी मुंबईतील असून त्यांनी 2014 साली आयआयटी मद्रास येथून बीटेकचे शिक्षण पूर्ण केलो होते, त्यानंतर, 2020 साली देशात 48 वी रँक मिळवत करवा यांनी युपीएससी परीक्षा क्रॅक केली. दीपक यांनी सीएपीएफ-एसी मध्ये 51वी रँक प्राप्त केल्यानंतर त्यांना बीएसएफमध्ये जबाबदारी देण्यात आली. दीपकने 2012 मध्ये राज्य वॉटर पोलो टूर्नामेंटमध्ये स्वर्ण पदक मिळवले असून 2012 आणि 2013 इंटर आयआयटी वॉटर पोलो स्पोर्ट्स मीटमध्येही सुवर्णकमाई केली आहे. विशेष म्हणजे पीएम अवार्ड्स एफआरए प्रोजेक्टसाठी त्यांची निवड करण्यात आली होती. तसेच, महाराष्ट्रातील आदिवासी विभागात मुख्यमंत्री फेलोशीफ योजनेंतर्गत काम केलं होतं. दीपक करवा हे सध्या हरियाणातील जींद येथे सहायक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
काय आहे मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रम
राज्यातील तरुणांनी राज्यातील विकास प्रक्रिया आणि त्यातील टप्पे जाणून घ्यावेत. तसेच या प्रक्रियेत सक्रियपमे सहभागी व्हावे, इथल्या कामाची पद्धत समजून घ्यावी. तसेच तरुणांनी समर्पित वृत्ताने समाजसेवा करावी. देशाचे सुजाण आणि सज्ञान नागरिक म्हणून तयार व्हावे यासाठी राज्यातील तरुणांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 29 मे 2015 मध्ये मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम सुरू केला. मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2015 साठी निवड झालेल्या 20 फेलोंना मानधन म्हणून 35 हजार रुपये आणि प्रवासखर्चासाठी 5 हजार रुपये असे एकत्रित 40 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तर, मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2017 च्या निवड प्रक्रियेत किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक असल्याची अट टाकण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्याने अभ्यासक्रमाचा भाग म्हणून पूर्णवेळ, इंटर्नशीप/अॅप्रेटिंसशिप/आर्टिकलशिप केलेली असावी, असा समावेश करण्यात आला होता. याचवर्षी म्हणजे 2017 मध्ये दीपक करवा यांनी मुख्यमंत्री फेलोशीप कार्यक्रमासाठी प्रवेश घेतला होता.
हेही वाचा
अजित पवारांच्या त्रासाला कंटाळून भाजप सोडतोय; माजी मंत्र्यांची घोषणा, तुतारी हाती घेणार