मुंबई: मेसेंजिंग अॅप असलेल्या व्हॉट्सअॅपने (WhatsApp) सप्टेंबर महिन्यात 26.85 लाख भारतीयांचे अकाउंट बंद केल्याचं समोर आलं आहे. व्हॉट्सअॅप इंडियाने या आपला मासिक अहवाल जारी केला असून त्यामध्ये ही माहिती दिली आहे. नवीन माहिती तंत्रज्ञान कायदा, 2021 च्या नियमानुसार  Information Technology Rules, 2021 (Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) व्हॉटसअॅपने ही कारवाई केल्याचं समोर आलं आहे. 


व्हॉट्सअॅपच्या तक्रार आणि निवारण विभागाला प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर या अकाउंटवर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सप्टेंबरमध्ये कंपनीकडे 666 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. 


यूजर्सच्या सुरक्षा आणि गोपनियतेला प्राथमिकता देणं हा व्हॉट्सअॅपचा प्रमुख उद्देश असल्याचं कंपनीने आपल्या अहवालात म्हटलं आहे. यातील मेसेंजिंग सिस्टमचा दुरुपयोग थांबवण्यासाठी एन्ड टू एन्ड एन्क्रिप्टेड बनवण्यात आलं आहे. व्हॉट्सअॅपने भारतीय यूजर्सच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी तक्रार आणि निवारण विभाग सुरू केला असून त्यामध्ये इंजिनिअर्स, टेक्निशियन, संशोधक, कायदेतज्ज्ञ आणि इतर क्षेत्रातले तज्ज्ञांचा समावेश आहे. 


व्हॉट्सअॅप यूजर्सला वारंवार स्पॅम मेसेज पाठवल्यास त्याची तक्रार करता येते. त्यानंतर व्हॉट्सअॅपकडून संबंधित अकाउंटवर कारवाई करण्यात येते. 


व्हॉट्सअॅपकडे तक्रार कशी करणार? 


जर आपल्याला व्हॉट्सअॅपकडे तक्रार करायची असेल तर wa@support.whatsapp.com यावर एक मेल करावा लागेल. यामध्ये आपल्याला काय अडचण आहे, आपली तक्रार काय आहे ते सविस्तरपणे नमूद करता येतं. ज्या कुणाची आपल्याला तक्रार करायची असेल त्याच्यासोबत झालेल्या संवादाचे स्क्रीनशॉट आपल्याला शेअर करावं लागेल. तसेच व्हॉट्सअॅप चॅटच्या माध्यमातूनही आपण तक्रार करु शकता. 


भारतात व्हॉट्सअॅपचे 50 कोटींहून अधिक यूजर्स असल्याचं सांगितलं जातंय. तर जगभरात व्हॉट्सअॅपचे दोन अब्जहून अधिक युजर्स आहेत. व्हॉट्सअॅप जगभरात लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. दररोज 100 अब्जहून अधिक मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवले जातात. Android मोबाइलवर युजर्स प्रतिदिवस सरासरी 38 मिनिटे WhatsApp चा वापर करतात.


WhatsApp वर आधार, पॅन कार्ड डाऊनलोड करता येणार 


आता WhatsApp वर डिजिलॉकर सेवा देखील उपलब्ध झाली आहे. त्यामुळे व्हॉट्सअॅपवर ता आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी कागदपत्रे सहजपणे डाउनलोड करता येणार आहे. तुम्हाला MyGov Helpdesk WhatsApp chatbot याच्या माध्यमातून डिजिलॉकरवरुन आधार कार्ड, पॅन कार्ड यासारखी कागदपत्रे WhatsAppवर डाऊनलोड करता येईल. 


WhatsApp वर MyGov हेल्पडेस्क च्या माध्यातून काही सोप्या स्टेप्सद्वारे कागदपत्रे डाऊनलोड करता येतात.  यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मार्कशीट आणि इतर कागदपत्रे डाऊनलोड करता येतात. त्यासाठी तुम्हला डिजिलॉकरवर खातं असणं अनिवार्य आहे. तुम्हाला क्षणात व्हॉट्सअॅपवर कागदपत्रे डाऊनलोड करता येतील.