Petrol Diesel Prices May Be Cut By Up To Rs 2 : केंद्र सरकार पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol Diesel Prices) कपात करुन सर्वसामान्यांना दिलासा देऊ शकतं. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किमती घसरल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांचं मार्जिनही वाढलं असून आता तोट्याऐवजी नफा कमावत आहेत. हे पाहता सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर 2 रुपयांनी कपात करू शकतं, अशी माहिती मिळत आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्यास मे 2022 नंतर तेलाच्या किमतीत होणारी ही पहिली कपात असेल. मे महिन्यात सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केलं होतं. त्यानंतर सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केलं होतं. सरकारी तेल कंपन्यांना पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मोठं मार्जिन मिळू लागलं आहे. अहवालानुसार, तेल कंपन्याना पेट्रोलवर प्रति लिटर 6 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांपर्यंत मार्जिन मिळत आहे.
सध्याची परिस्थिती अशीच राहिली तर...
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर भारतीय रुपया आणि कच्च्या तेलाच्या किमती सध्याच्या पातळीवर राहिल्या तर सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रतिलिटर 2 रुपयांची कपात करू शकतं. मात्र, यावर कोणताही निर्णय घेण्यापूर्वी जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमतीत आणखी किती चढ-उतार होऊ शकतात, याचा अभ्यास केला जाणार आहे. सध्या, रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती खूपच कमी आहेत.
विंडफॉल कर (Windfall Tax) कपात
टाईम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, सरकारनं मंगळवारी विंडफॉल टॅक्स, म्हणजेच कंपन्यांच्या नफ्यातील वाटा कमी केल्यानं देशांतर्गत बाजारातील तेलाच्या किमतींवरील दबाव आता कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत. जर सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत लिटरमागे दोन रुपयांची कपात केली, तर जनतेला महागाईपासून दिलासा मिळेल. याशिवाय हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाला राजकीय फायदाही होईल आणि महागाईबाबत विरोधकांच्या आरोपांना उत्तर देता येईल.
भारतानं 25 टक्के कच्च्या तेलाची खरेदी ब्रेंट क्रूडमधून केली आहे. अशा परिस्थितीत, सरकारनं मे महिन्यात उत्पादन शुल्क कमी केलं. तेव्हा ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 115 डॉलर होती. जी सध्या प्रति बॅरल 95 डॉलरवर चालू आहे. एवढंच नाहीतर सप्टेंबरमध्ये त्याची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरवर पोहोचली होती.
यापूर्वी कंपन्यांना होत होता तोटा
सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी त्यांच्या मार्जिनमध्ये घसरण आणि तोटा झाल्याची तक्रार मे महिन्यात केली होती. तेव्हा कंपन्यांनी सांगितलं होतं की, पेट्रोलवर प्रतिलिटर 10 रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर 14 रुपयांचं नुकसान होत आहे. इतकंच नाहीतर इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियमनंही संयुक्तपणे 19 हजार कोटींचं नुकसान झाल्याचं सांगितलं होतं. मात्र, आता पुन्हा या कंपन्या नफ्यात परतल्या असून पेट्रोल आणि डिझेलवरील प्रतिलिटर मार्जिनही वाढू लागलं आहे.