नवी दिल्ली : मेसेजिंग सर्व्हिस अॅप व्हॉट्सअॅपने यावर्षी 15 मे ते 15 जून दरम्यान 20 लाख भारतीय अकाऊंट्स बॅन केले आहेत. कंपनीने आपल्या पहिल्या मासिक अनुपालन अहवालात ही माहिती दिली. नवीन माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत हा अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. नवीन नियमांतर्गत, 50 लाखांहून अधिक युजर्स असणाऱ्या प्रमुख डिजिटल प्लॅटफॉर्मंना दरमहा अनुपालन अहवाल पब्लिश करणे आवश्यक आहे. या अहवालात त्यांना आलेल्या तक्रारी आणि त्यावरील कारवाईचा उल्लेख करणे आवश्यक आहे.
व्हॉट्सअॅपने गुरुवारी दिलेल्या माहितीत म्हटले की, अकाऊंट्सवरुन मोठ्या प्रमाणात हानिकारक किंवा नको असलेले मेसेज पाठवण्यापासून रोखणे हे आमचं मुख्य लक्ष्य आहे. फक्त 15 मे पासून ते 15 जूनपर्यंत अकाऊंटचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 20 लाख अकाऊंट्सवर बंदी घालण्यात आली आहे.
कंपनीने स्पष्ट केले की, 95 टक्क्यांपेक्षा जास्त निर्बंध हे स्वयंचलित किंवा बल्क मेसेज (स्पॅम) च्या अनधिकृत वापरामुळे लादण्यात आले आहेत. 2019 पासून जास्त अकाऊंट्स ब्लॉक केली जात आहेत. कारण सिस्टम अधिक प्रगत झाली आहे आणि असे अकाऊंट्स शोधण्यात मदत झाली आहे.
व्हॉट्सअॅप दर महिन्याला जगभरातील सरासरी 80 लाख अकाऊंट्स ब्लॉक किंवा निष्क्रिय करत आहे. गुगल, कू, ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्राम यासह अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनेही त्यांचे अनुपालन अहवाल सादर केले आहेत.
व्हॉट्सअॅपकडून कारवाई कधी केली जाते?
कंपनीच्या मते, जेव्हा कोणतेही बेकायदेशीर, अश्लील, बदनामीकारक, धमकी देणे, धमकावणे, त्रास देणे आणि द्वेषयुक्त भाषण किंवा भेदभाव करणे, धार्मिक भावना भडकवणे अशा बेकायदेशीर पोस्ट शेअर्सला केल्यास अकाऊंटवर बंदी घातली जाते. या व्यतिरिक्त, एखादा वापरकर्त्याने व्हॉट्सअॅपच्या अटी व शर्तींचे उल्लंघन केले तरीही त्याचे अकाऊंट बंद केला जाते.
नवीन आयटी नियम काय आहेत?
नवीन आयटी नियम, ज्यांना इंटरमीडियरी गाईडलाईन्सआणि डिजिटल एथिक्स कोड नियम 2021 म्हणून देखील ओळखले जाते. त्यातील नियम 4(d) मध्ये असे म्हटले आहे की सोशल मीडिया कंपन्यांना मासिक आधारावर अनुपालन अहवाल द्यावा लागेल. यामध्ये कंपन्यांना किती तक्रारी आल्या आणि त्यांनी त्यावर काय कारवाई केली हे सांगावे लागेल.