नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर रोजी पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद झाल्याची घोषणा केली. यानंतर चलनातील 86 टक्के नोटा एकाएकी बंद झाल्या. जुन्या नोटा देशभरातील विविध बँकांमध्ये जमा केले जात आहेत. आजपासून बँकांमध्ये पैसे बदलून मिळणार नाही, पण जमा मात्र करु शकता.

त्यामुळे 30 डिसेंबरपर्यंत रिझर्व्ह बँकेकडे सुमारे 23 अब्ज जुन्या नोटा जमा होतील. याची किंमत सुमारे 14 लाख कोटी रुपये होती. पण या नोटांची किंमत आता केवळ रद्दीएवढी झाली आहे. या जुन्या नोटा नष्ट करण्याचं मोठं आव्हान रिझर्व्ह बँकेसमोर आहे.

मात्र आंतरराष्ट्रीय बिझनेस न्यूज कंपनी ब्लूमबर्गने आश्चर्यकारक अहवाल दिला आहे. या अहवालानुसार, 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा पसरवल्या तर चक्क चंद्रापर्यंत जाण्या-येण्यासाठीचा रस्ता पाच वेळा बनवला जाऊ शकतो. पृथ्वीवरुन चंद्रापर्यंतचं अंतर 3 लाख 84 हजार 400 किलोमीटर आहे. तर जुन्या नोटा एकावर एक ठेवल्यास त्यांची उंची 26 लाख 54 हजार मीटर होईल.

इतकंच नाही तर या नोटांची उंची जगातील सर्वात उंच शिखर अर्थात माऊंट एव्हरेस्टलाही मात देईल. जुन्या नोटा माऊंट एव्हरेस्टपेक्षा 300 पट जास्त उंचीच्या होतील. माऊंट एव्हरेस्टची उंची 8848 मीटर आहे.

हा आकडा धक्कादायक आहे. त्यामुळे एवढ्या जुन्या नोटा नष्ट करण्याचं डोंगराएवढं आव्हान आरबीआयसमोर आहे.