पाटणा : पाटण्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाच्या इंजिनमध्ये धूर दिसला. स्मोक डिटेक्ट होताच आग लागण्यापूर्वीची खबरदारी म्हणून पायलटने विमानाचं टेक ऑफ तातडीने रोखलं. पाटणा-दिल्ली 6E-508 या विमानात हा प्रकार घडला.

विमानाच्या केबिनमध्ये धूर दिसल्याने पायलटने विमान धावपट्टीवरच थांबवलं आणि प्रवाशांना तातडीनं उतरण्याच्या सूचना दिल्या. वैमानिकाची सूचना मिळताच विमानातल्या प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी विमानातून उड्या टाकल्या.

एकमेकांच्या अंगावर पडल्यामुळे काही प्रवासी जखमी झाले. यावेळी विमानात 174 प्रवासी होते. सुदैवाने
सर्वजण सुखरुप आहेत.

फक्त धूर आढळला असून आग किंवा टायर फुटला नसल्याचा दावा इंडिगो एअरलाईनने केला आहे. डीजीसीएने मात्र अंतर्गत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

या अपघातामुळे रात्री साडेआठ वाजेपर्यंत एकही विमान धावपट्टीवरुन उडालं नाही.त्यामुळे जीएसटीच्या कार्यक्रमासाठी दिल्लीला निघालेले भाजपचे नेते सुशील मोदी, केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांच्यासह काही खासदार आणि नेते यांना विमानतळावरच अडकून राहावं लागलं.