शाहजहानपूर, उत्तर प्रदेश : भारतीय लग्नसोहळ्यांमध्ये, विशेषतः वरातीत 'नागीन डान्स' अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र स्वतःच्या लग्नातच नागीन डान्स करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. दारुच्या अंमलाखाली नागीन डान्स करणाऱ्या नवरदेवाला पाहून वधूने लग्न मोडल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे.


लग्नाचे विधी सुरु होण्यापूर्वीच वराने केलेल्या बिभत्स नागीन डान्समुळे वधूने तात्काळ लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. नवरदेवाच्या कुटुंबीयांनी तिची वारंवार समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र ते निष्फळ ठरलं. अखेर वरपक्ष मोकळ्या हाती घरी परतले. दुसऱ्याच दिवशी तिने दुसऱ्या तरुणाशी लगीनगाठ बांधली.

उत्तर प्रदेशातील शाहजहानपूरमध्ये राहणारी 23 वर्षांची प्रियंका त्रिपाठी अनुभव मिश्रासोबत विवाहबंधनात
अडकणार होती. विधी सुरु होण्यास काही मिनिटांचा कालावधी असतानाच डीजेने लावलेल्या गाण्यावर नवरदेवाने ताल धरला आणि पाहता पाहता बिभत्स नागीन डान्स करण्यास त्याने सुरुवात केली.

नवरदेवाच्या मित्रांनी त्याच्यावर नोटा उधळल्या आणि वधूपक्ष अवाक झाला. त्याचवेळी हा दारुडा आपल्यासाठी योग्य नसल्याची खूणगाठ तिने मनाशी बांधली. वरपक्षाच्या विनवण्या, धमक्या यांना भीक न घालता वधू कुटुंबीय आणि मित्रमंडळींसह मांडवातून परतली. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी तिने दुसऱ्या तरुणाशी लगीनगाठ बांधली.