Heatstroke News : सध्या राज्यात तापमानात (temperature) मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेलाय. अनेक ठिकाणी उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळं या काळात उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता असते. या काळात उष्माघाताचा (Heatstroke) सामना कसा करावा? याची लक्षणे आणि उपाययोजना काय कराव्यात? याबाबतची सविस्तर माहिती डॉ. रेशू अग्रवाल (Dr. Reshu Aggarwal) यांनी दिली आहे. त्या इंटर्नल मेडिसिन, मणिपाल हॉस्पिटल, बाणेर, पुणे इथं कार्यरत आहेत.

  


हीटस्ट्रोकवर तातडीने वैद्यकीय उपचार करणे आवश्यक 


हीटस्ट्रोक ही एक घातक अशी वैद्यकीय स्थिती आहे, जी बराच वेळ कडक उन्हात राहिल्यामुळे संभवते. उन्हाळ्यात ही बाब सामान्य असते, जेव्हा शरीराचे तापमान कधीकधी 104°F किंवा त्यापेक्षा जास्त होते आणि स्वेटिंग मेकॅनिसम निष्फळ होते. हीटस्ट्रोकवर तातडीने वैद्यकीय उपचार करणे आवश्यक असते. कारण त्याचा तुमच्या मेंदूवर, हृदयावर, मूत्रपिंडांवर आणि स्नायूंवर लगेच परिणाम होतो. जर वेळेवर उपचार केले गेले नाहीत, तर शरीरात गंभीर स्वरूपाची जटिलता निर्माण होण्याचा धोका वाढतो. 


हीटस्ट्रोकचे दोन प्रकार


हीटस्ट्रोक दोन प्रकारचे असतात: एक्झर्शनल (अती परिश्रमामुळे होणारा) आणि नॉन- एक्झर्शनल (परिश्रमाशी संबंधित नसलेला). त्यापैकी एक्झर्शनल हीटस्ट्रोक हा तीव्र उन्हात घराबाहेर असताना, अती परिश्रमामुळे येतो, तर दुसरा प्रकार वयोवृद्ध लोकांना किंवा मधुमेहासारख्या जुनाट आजाराने पीडित लोकांना प्रभावित करतो.


हीटस्ट्रोकची लक्षणे ओळखणे:


1) उच्च शारीरिक तापमान


हीटस्ट्रोक आलेल्या व्यक्तीचे शारीरिक तापमान रेक्टल थरमॉमीटरने मापले असता 104°F (40°C) किंवा त्यापेक्षा जास्त असते. एखाद्या व्यक्तीला हीटस्ट्रोक आल्याचे हे पहिले लक्षण आहे.
2) मळमळ आणि उलटी


उष्णता खूप जास्त झाल्यास तुम्हाला पोटामधे अस्वस्थ वाटू शकते, उलटी होईल असे वाटते. अशा वेळी शरीर हायड्रेटेड ठेवले पाहिजे आणि उन्हाळ्यात द्रव पदार्थ आणि फळे यांचे सेवन अधिक प्रमाणात केले पाहिजे.


3)नाडी जलद होणे आणि जलद श्वासोच्छ्वास


अती उष्म आणि दमट हवामानात राहिल्याने तुमचे श्वसन जलद होते आणि दीर्घ होत नाही. आणि उष्णतेचा हृदयावर अतिरिक्त दबाव आल्याने शरीर थंड करण्यासाठी तुमची नाडी जलद होते.


4) डोकेदुखी


 हे हीटस्ट्रोकचे अगदी सामान्य लक्षण आहे. उष्णतेमुळे तुमचे डोके ठणकते. म्हणून, बाहेर उन्हात जाताना नेहमी आपले डोके झाकून घ्यावे.


5) चक्कर येणे आणि गोंधळ


चक्कर येणे आणि गोंधळ अशी न्यूरोलॉजिकल लक्षणे देखील हीटस्ट्रोकमुळे उद्भवू शकतात. परिस्थिती फारच बिघडली तर शुद्ध हरपू शकते.


6) संतुलन राखण्यात अडचण


बराच काळ उन्हात राहिल्याने स्नायू कमजोर होतात आणि थकवा जाणवतो. त्यामुळे शरीराचे संतुलन राखणे कठीण होऊन बसते.


हीट स्ट्रोकपासून वाचण्यासाठी काही सूचना


शरीर हायड्रेटेड ठेवा: ताक, नारळाचे पाणी आणि लिंबू पाणी हे उत्तम पर्याय आहेत, पण हायड्रेशनचा प्राथमिक स्रोत म्हणून साधे पाणी प्या.


आरामदायी व सैलसर कपडे घाला: सूती कपडे घाला आणि उन्हापासून रक्षण करण्यासाठी टोपी, गॉगल्सचा उपयोग करा.


त्वचेचे रक्षण करा: उन्हात जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा. कारण थेट UV किरणे तुमच्या त्वचेचे नुकसान करू शकतात.


उघड्यावर व्यायाम करण्याचे टाळा: भर दुपारच्या वेळी घराबाहेर शारीरिक श्रमाची कामे करणे टाळा, कारण त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अशा कामांसाठी ऊन नसेल अशी वेळ निवडा आणि मध्ये मध्ये सावलीत किंवा वातानुकूलित जागेत बसून आराम करा.


मद्य सेवन करू नका: उन्हाळ्यात मद्य किंवा कॅफिनयुक्त पेयांचे सेवन टाळा, कारण त्यांच्यामुळे शारीरिक तापमानात वाढ होऊन डीहायड्रेशन होऊ शकते.