नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून हल्ला चढवला आहे. कालच दहशतवादी एलओसी पार करुन भारतात घुसण्याच्या तयारीत होते. घुसखोरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी भारतीय सैन्याने काल रात्री सर्जिकल स्ट्राईक केले, भारताचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.


सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?

पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन अतिरेकी तसंच घातपाती कारवाया करत आहे. भारत स्वतःहून कधीही शस्त्रसंधीचं उल्लंघन करत नाही. पाकिस्तानच्या गोळीबाराला गोळीबारानेच प्रत्युत्तर दिलं जातं. मात्र काल रात्री भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक्स करुन पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे.

सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारक आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक.

थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सोप्या भाषेत घुसून मारणं.

सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.

साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होते. भारताने काल रात्री पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या प्रशिक्षण केंद्राना लक्ष्य करत सर्जिकल स्ट्राईक केले.