सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय?
एबीपी माझा वेब टीम | 27 Sep 2017 02:59 PM (IST)
सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय.
नवी दिल्ली : भारताने पु्न्हा एकदा शेजारी देशाच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आहे. यावेळी पाकिस्तान नाही, तर म्यानमारच्या सीमेपार जाऊन भारतीय सैन्याने सर्जिकल स्ट्राईक घडवला. पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या वर्षपूर्तीच्या दोन दिवस आधी हा दुसरा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला आहे. सर्जिकल स्ट्राईक म्हणजे काय? सर्जिकल स्ट्राईक ही युद्धशास्त्रातील एक संज्ञा आहे. सर्जिकल स्ट्राईकमध्ये निष्णात सर्जन ज्या पद्धतीने शस्त्रक्रिया करताना नेमक्या ठिकाणची शस्त्रक्रिया करतो, त्याचप्रमाणे आपल्याला अपेक्षित असलेल्या ठिकाणी नेमकी तसंच परिणामकारक आणि अचूक शस्त्र कारवाई म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. थोडक्यात सर्जिकल स्ट्राईक म्हणजेच अतिशय नेमकेपणाने केलेली लष्करी कारवाईच असते. सोप्या भाषेत घुसून मारणं. सर्जिकल स्ट्राईकमध्ये मोठं नुकसान टाळण्यावर भर दिला जातो. आपल्याला अपेक्षित ठिकाणावरच नेमका हल्ला करणं म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक होय. साधारणपणे विमानांद्वारे करण्यात येणाऱ्या बॉम्बहल्ल्यात आपल्याला अपेक्षित ठिकाणापेक्षा आजूबाजूच्या परिसराचीही मोठी हानी होते.