नवी दिल्ली : काळा पैसा नष्ट करण्यात मोदी सरकार अपयशी ठरलंय का असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, साडे 15 लाख कोटी जुन्या नोटांपैकी 14 लाख कोटी नोटा बँकेत पुन्हा परतल्या आहेत.

खरंतर नोटाबंदीनंतर सरकारला 3 लाख कोटींचा काळा पैसा सापडेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात केवळ दीड लाख कोटींचा काळा पैसा नष्ट करण्यात यश आलं आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँकेला या सर्व पैशांची सरकारला भरपाई द्यावी लागणार आहे.

अनेकांनी बँकांच्या माध्यमातून काळ्याचं पांढरं केल्याचं ढळढळीत सत्य पुन्हा समोर आलं आहे. त्यामुळे आता अडीच लाखांपेक्षा जास्त पैसा बँकेत जमा करणाऱ्यांकडून टॅक्स वसुलीचा उपाय सरकारच्या हाती आहे.

नोटाबंदीच्या निर्णयाचा आजचा तब्बल 50 वा दिवस आहे. आज केंद्रीय कॅबिनेट बैठकीत जुन्या नोटांसंदर्भात मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. 30 डिसेंबरनंतर हजार आणि पाचशेच्या जुन्या नोटा जवळ बाळगणं तुम्हाला महागात पडू शकतं. 10 पेक्षा जास्त जुन्या नोटा तुमच्याकडे सापडल्यास त्यावर दंड आकारण्याचा विचार केंद्राच्या विचाराधीन आहे.