मुंबई: नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष (BJP National President) जेपी नड्डा (J P Nadda) यांना आरोग्यमंत्री करण्यात आले आहे. जेपी नड्डा यांचा अध्यक्षपद कार्यकाळ 30 जून रोजी संपत आहे. त्याआधी भारतीय जनता पक्ष आपल्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाच्या नावाची घोषणा करू शकतो. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पगार किती आणि राष्ट्रीय अध्यक्षाची निवड कशी होते असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.


भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कसा निवडला जातो? 


भाजपच्या घटनेच्या कलम 19 नुसार राष्ट्रीय अध्यक्षाची निवड पक्षाच्या सदस्यांद्वारे केली जाते. ज्यामध्ये जिल्हा घटकांद्वारे निवडलेले सदस्य, पक्षाच्या आमदारांनी स्वतःमधून निवडलेले 10 टक्के सदस्य, पक्षाच्या खासदारांचे 10 टक्के सदस्य, राज्य परिषदांनी निवडलेले सदस्य, पक्षाच्या संसद सदस्यांनी स्वतःमधून निवडलेले 10 टक्के सदस्य यांचा समावेश होतो.


भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष हा गुप्त मतदान प्रक्रियेद्वारे निवडला जातो. राज्यातील किमान 50 टक्के जिल्ह्यांतून राज्य परिषद सदस्य निवडून आल्यानंतरच प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होते. जो सदस्य पक्षामध्ये सक्रिय असतो आणि किमान 15 वर्षे प्राथमिक सदस्य असतो त्यालाच राष्ट्रीय अध्यक्ष बनवले जाते.


आजपर्यंत मतदान झालं नाही


भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवड मतदानाद्वारे केली जाते. परंतु विशेष बाब म्हणजे पक्ष स्थापन झाल्यापासून आजतागायत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान झालेले नाही. पक्षात परस्पर संमतीनेच अध्यक्षाची निवड केली जाते.


निवडणुका बिनविरोध कशा होतात?


भाजपच्या घटनेनुसार, निवडणूक समितीतील कोणतेही 20 सदस्य राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी पात्र असलेल्या व्यक्तीचे नाव संयुक्तपणे मांडू शकतात. हा संयुक्त प्रस्ताव किमान पाच राज्यांमधून आला पाहिजे जिथे राष्ट्रीय परिषद निवडणुका झाल्या आहेत. यानंतर त्या व्यक्तीची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होते.


राष्ट्रीय अध्यक्षाला पगार आणि सुरक्षा व्यवस्था किती?


भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष हे पद हे सरकारी पद नाही, त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या वेतनाबाबत कोणतीही विशेष अशी तरतूद नाही. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रीय अध्यक्षांचा पगार 80 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत आहे. मात्र सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना केंद्र सरकारकडून झेड श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे. आयबीच्या थ्रेट पर्सेप्शन रिपोर्टच्या आधारे गृहमंत्रालयाने त्यांना ही सुरक्षा पुरवली होती. या अंतर्गत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) कमांडो त्यांच्या सुरक्षेसाठी सदैव तैनात असतात.


ही बातमी वाचा: