BJP Margdarshak Mandal Members : भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांना पक्षाच्या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य बनवल्याची बातमी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. केरळ काँग्रेसने याबाबत एक ट्विट केलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. @INCKerala या ट्विटर हँडलवर भाजपच्या वेबसाईटचे एक छायाचित्र आणि लिंक शेअर करण्यात आली. त्यामध्ये नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांना पक्षाच्या 'मार्गदर्शक मंडळ'चे सदस्य दाखवण्यात आलं. खरंच भाजपने या दोन नेत्यांना मार्गदर्शक मंडळात पाठवलं आहे का? यासंबंधिचा निर्णय कधी घेण्यात आला? या सर्वाची सत्यता पडताळण्यात आल्यानंतर महत्त्वाची माहिती समोर आली.
केरळ काँग्रेसचं ट्विट काय? (Kerala Congress Tweet On Narendra Modi)
केरळ काँग्रेसने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'भाजपच्या वेबसाईटनुसार, मोदी आणि राजनाथ सिंह अधिकृतपणे मार्गदर्शक मंडळात सामील झाले आहेत. संसदेत मांडण्यात येणारा विश्वासदर्शक ठराव अयशस्वी होण्याची ही लक्षणं आहेत का?
नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह हे आधीपासूनच मार्गदर्शक मंडळात (BJP Margdarshak Mandal Members)
केरळ काँग्रेसने केलेल्या आरोपानंतर सत्य तपासले असता वेगळीच माहिती समोर आली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने मे 2014 मध्ये केंद्रात सत्ता मिळवली. तीन महिन्यांनंतर भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांनी मार्गदर्शक मंडळाची स्थापना केली. भाजपच्या पाच ज्येष्ठ नेत्यांना या मार्गदर्शक मंडळाचे सदस्य करण्यात आले. शाह यांच्या या निर्णयाची माहिती भाजपने 26 ऑगस्ट 2014 रोजी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्याशिवाय मार्गदर्शक मंडळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांचा समावेश होता.
डिसेंबर 2018 मध्ये वाजपेयींच्या निधनानंतर मार्गदर्शक मंडळाची सदस्य संख्या चार झाली. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवरील मार्गदर्शक मंडळाचे पेजही अपडेट करण्यात आले आहे. त्यामुळे आता वाजपेयी वगळता उर्वरित चार सदस्यांचा तपशील त्या ठिकाणी उपलब्ध आहे.
केरळ काँग्रेसने भाजपवर निशाणा साधताना वस्तुस्थिती पूर्णपणे तपासली नाही. आता सोशल मीडियावर त्याची सत्यता पडताळली जात आहे.
ही बातमी वाचा: