याप्रकरणात जर माझ्यावर आरोप असते किंवा इटलीच्या न्यायालयाने जर माझं नाव घेतलं असतं, तर मोदींनी आतापर्यंत मला अटक केली असती. मात्र सोनिया गांधींची साधी चौकशीही नाही, असा निशाणा केजरीवलांनी साधला.
केजरीवाल यांनी ट्विट करून मोदी आणि भाजपवर हल्लाबोल केला.
मोदींनी माझ्यावर सीबीआय धाडी टाकल्या, मात्र सोनिया आणि रॉबर्ट वढेरांवर नाही. मोदींना गांधी परिवार प्रामाणिक वाटतो, असंही ट्विट केजरीवालांनी केलं आहे.
काय आहे ऑगस्टा वेस्टलँण्ड घोटाळा
भारतीय हवाई दलाने 2010 मध्ये इटलीच्या ऑगस्टा या कंपनीकडून 3600 कोटी रुपयात 12 व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरची खरेदीचा करार केला. ज्यावेळी हा व्यवहार झाला, त्यावेळी केंद्रात मनमोहन सिंह यांच्या नेतृत्त्वातील यूपीए सरकार होतं. तर हवाई दलाचे प्रमुख एस पी त्यागी होते.
या व्यवहारासाठी कमीशनरुपी 10 टक्के म्हणजे सुमारे 350 कोटी रुपये लाच म्हणून देण्यात आली होती, असं सांगण्यात येतं.
या व्यवहारात लाचखोरी झाल्याचं 2012 मध्ये समोर आलं. घोटाळ्याच्या गदारोळानंतर 2013 मध्ये तत्कालीन संरक्षण मंत्री ए के अँटोनी यांनी भ्रष्टाचार झाल्याचं कबूल करत, हा सौदाच रद्द केला होता. तोपर्यंत तीन हेलिकॉप्टर्स भारतात आले होते.
इटलीच्या कोर्टाने या संपूर्ण व्यवहारात 125 कोटी रुपयांची लाचखोरीचा प्रकार घडल्याचा ठपका ठेवला आहे. ऑगस्टा वेस्टलँड आणि ‘फिनमेक्कनिका’ या दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांनी लाच दिल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही कंपनीच्या प्रमुखांना साडेचार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
इटलीच्या न्यायालयाने याप्रकरणात ऑगस्टा वेस्टलँड कंपनीच्या प्रमुखाला शिक्षा ठोठावल्यामुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेला आलं आहे. या कंपनीच्या प्रमुखाने या व्यवहारासाठी भारतात लाच दिल्याचा आरोप आहे.
महत्त्वाचं म्हणजे भारतात कोणाला लाच दिली हे अद्याप समोर आलं नसलं तरी कोर्टाने चार वेळा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचं नाव घेतलं आहे.