यूरिन इन्फेक्शन दूर होईपर्यंत वाजपेयींना रुग्णालयातच ठेवलं जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. वाजपेयींना तुम्ही-आम्ही जाहीर कार्यक्रमांत पाहून आता जवळपास नऊ वर्षे झाली आहेत. 2009 सालापासून ते अंथरुणाला खिळून आहेत. सभा, मैफली आपल्या अमोघ वक्तृत्वाने गाजवणारा हा नेता अचानक समाजापासून एकाकी पडला. तब्बल एक दशक त्यांना असं बेडवर पडून काढावं लागतंय. या अफाट व्यक्तिमत्वाला ज्या आजाराने जखडलंय त्या आजाराचं नाव आहे डिमेन्शिया अर्थात स्मृतीभ्रंश...
काय आहे डिमेन्शिया?
डिमेन्शिया पीडित रुग्णांमध्ये आढळणारं सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे शॉर्ट मेमरी लॉस. वयाची साठी ओलांडली की डिमेन्शियाची शक्यता बळावत जाते. वयपरत्वे माणसाची स्मरणशक्ती कमीच होते. पण अलजायमर या मेंदूशी निगडीत रोगामुळे डिमेन्शिया होण्याची शक्यता वाढते. अलजायमरमुळे मेंदूची कार्यक्षमता कमी होते आणि त्यात डिमेन्शियाची भर पडली की परिस्थिती गंभीर बनते. अशा रुग्णाला सतत निगराणीखाली ठेवण्याची आवश्यकता असते.
डिमेन्शियामधला स्मृतीभ्रंश हा अनेकदा घातक ठरतो. तुम्ही माणसाची नावं विसरता, तुम्ही परिचित ठिकाणंही विसरता इतपर्यंत ठीक आहे. पण अनेक केसेसमध्ये माणसं पुन्हा घरी यायचं देखील विसरतात, असं दिशाहीन भटकत असतानाच डिमेन्शिया पेशंटचे अपघाती मृत्यू अधिक झालेले आहेत. दिल्लीतल्या मनोहर लाल शर्मा यांची केसतर याबाबतीत फार भयानक आहे. पाच दिवस घराबाहेर भटकल्यानंतर डिहायड्रेशनमुळेच त्यांचा मृत्यू झाला. कारण, पाणी प्यायची आठवण सुद्धा त्यांना राहिली नाही. त्यामुळे आजार साधा दिसत असला तरी कधीकधी तो इतकं भयानक रुप घेतो.
सरकारी पातळीवर डिमेन्शियाकडे दुर्लक्ष
सरकारी पातळीवर अजूनही या आजाराला फारसं गांभीर्याने घेतलं जात नाही. डिमेन्शिया पीडीत रुग्णांसाठी देशात जे सात डे केअर सेंटर आहेत, त्यांना 2015-16 या एकूण वर्षभरात सरकारकडून मिळालेला निधी होता केवळ 66 लाख रुपयांचा. व्यक्तीची मेंटल स्थिती बिघडणं आणि डिमेन्शिया यात एक बारिक फरक आहे. पण तो ओळखता न आल्यामुळे अनेकदा व्यक्तीवर उपचारही होत नाहीत.
2004 साली सत्ता गेल्यानंतरच वाजपेयींचा जाहीर कार्यक्रमांमधला वावर कमी झाला होता. पण 2009 सालानंतर तो जवळपास पूर्णपणे बंद झाला. तीन वर्षांपूर्वी 2015 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला, तेव्हाही तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यासाठी स्वत: वाजपेयींच्या घरी गेले होते.
दिल्लीतल्या कृष्णमेनन रोडवर वाजपेयींचं निवासस्थान आहे. या ठिकाणी वाढदिवसाच्या वेळी काही नेते त्यांना भेटायला येतात, पण ही भेट काहीशी एकतर्फी असते. कारण, बाकी शरीरातले अवयव सुरळीत असले तरी वाजपेयी मानसिकदृष्ट्या कुठला प्रतिसाद देऊ शकत नाहीत.