INS Vikrant :  'आयएनएस विक्रांत' ही युद्धनौका राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेने 1971 च्या भारत-पाक युद्धामध्ये महत्वाची कामगिरी बजावली होती. या आयएनएस विक्रांत युद्धनौकेचा नेमका इतिहास काय आहे? आयएनएस विक्रांतचे नेमकं पुढे काय झालं? जाणून घेऊयात


भारतीय नौदलाची ताकद वाढावी यासाठी 1961 मध्ये  आयएनएस विक्रांतचा समावेश भारतीय नौदलात करण्यात आला. त्याआधी सन 1945 मध्ये ब्रिटीश नौदलात या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला होता. कामगिरी बजावण्यास सज्ज असताना त्याआधीच दुसरे महायुद्ध संपले. त्यानंतर ब्रिटीश नौदलातून ही युद्ध नौका निवृत्त झाली. त्यानंतर 1957 मध्ये भारताने ही युद्धनौका खरेदी केली. 


याच आयएनएस विक्रांत ने 1971च्या भारत पाकिस्तान युद्धात मोठी कामगिरी बजावली. विक्रांतच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या ताकदीत वाढ झाली. विमानवाहू युद्धनौकेमुळे पाकिस्तानसमोर कडवं आव्हान निर्माण झाले. पाकिस्तानकडून विक्रांतला उद्धवस्त करण्यासाठी कट आखला जाऊ लागला. पाकिस्तानने पीएनएस गाझी ही पाणबुडी पाठवली. मात्र, पाकिस्तानचा हा कट भारतीय नौदलाने उधळून लावला. 


सन 1997 मध्ये आयएनएस विक्रांत युद्धनौका डी कमिशनिंग म्हणजे सेवामुक्त झाली. वर्ष  2012 पर्यंत आयएनएस विक्रांत युद्धनौका ही युद्ध संग्रहालय म्हणून सर्वसामान्यांसाठी खुले करण्यात आले होते. यावेळी सर्वसामान्य नागरिकांना ही युद्ध नौका आणि तिने गाजवलेल्या पराक्रमाचे किस्से जाणून घेता आले. 


सन 2014 साली आयएनएस विक्रांत लिलावात काढण्याचा निर्णय घेण्यात आला. लीलावाला विरोध करत आयएनएस युद्ध संग्रहालयात रूपांतर करण्याची मागणी करण्यात आली होती. युद्धनौकेची देखभाल करण्यास महाराष्ट्र सरकारने असमर्थता दर्शवली. लीलाव प्रक्रियेमध्ये आयबी कमर्शिअल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आयएनएस विक्रांत ची खरेदी केली. 


विक्रांतसाठी हायकोर्टात धाव


डिसेंबर २०१३ मध्ये या जहाजाचे जतन करून त्याचे संग्रहालयात रूपांतर करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु संरक्षण मंत्रालयाने या जहाजाचे सागरी संग्रहालयात रूपांतर करणे व्यवहार्य नसल्याचे उत्तर दिले. त्यानंतर न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आणि मंत्रालयाने सर्वोच्च बोली लावणाऱ्याला जहाज विकण्यासाठी सल्लागार मंडळाची स्थापना केली होती आणि त्याच लिलावात विक्रांतची खरेदी करण्यात आली.


विक्रांतच्या लोखंडापासून बाईक


आयएनएस विक्रांत 2014 मध्ये स्क्रॅपमध्ये  (भंगारात) गेल्यानंतर दोन वर्षांनी याच आयएनएस विक्रांतच्या लोखंडापासून बजाज कंपनीने 'व्ही' नावाची बाईक 1 फेब्रुवारी 2016 रोजी लॉन्च केली. या बाईकमध्ये विक्रांत या युद्धनौकेचे मेटल वापरण्यात आलं आलं होतं.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha