रसगुल्ला पश्चिम बंगालचाच, ओदिशा सरकारला दणका
एबीपी माझा वेब टीम | 14 Nov 2017 03:24 PM (IST)
रसगुल्ल्यावर ओडिशा सरकारने दावा केला. त्यानंतर पश्चिम बंगालने कोर्टाचे दरवाजे ठोठावले
कोलकाता : रसगुल्ला बिकानेरचा नाही, तर पश्चिम बंगालचा असं म्हणावं लागणार आहे. रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयानं दिला आहे. ही 'गोड' बातमी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. https://twitter.com/MamataOfficial/status/930338587920363520 कोर्टाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम बंगालमधील लाखो रसगुल्ला उत्पादकांना होणार आहे. जशी महाराष्ट्राची पुरणपोळी, उकडीचे मोदक, गुजरातचा खाकरा, ढोकळा, तमिळनाडूचा इडली-डोसा, तसा बंगालचा रसगुल्ला असं पूर्वीपासून म्हटलं जायचं. पण ओडिशा राज्यानं यावर आक्षेप घेत जीआय मानांकनासाठी प्रयत्न सुरु केले. रसगुल्ल्यावर ओडिशा सरकारने दावा केला. पुरीतल्या जगन्नाथ मंदिरात रसगुल्ला खीरमोहन या नावानं देवासमोर प्रसादासाठी ठेवला जायचा. प्रसादाची ही प्रथा मागील कित्येक दशकांपासून जगन्नाथ मंदिरात राबवली जाते, असं ओडिशा सरकारने सांगितलं. या दाव्याचा विरोध करत पश्चिम बंगालनंही या गोड पदार्थाच्या मालकी हक्कासाठी प्रयत्न केले. त्यात पश्चिम बंगालनं रसगुल्लाचं जीआय मानांकन मिळवत ही लढाई जिंकली आहे. त्यामुळे रोशगुल्ला आरो मिश्टी होय गयाछे, असंच म्हणावं लागेल.