मुंबई: महाराष्ट्र सरकार पळपुट्या विजय मल्ल्यासाठी गेस्ट हाऊस अर्थात विश्रामगृह देण्याच्या तयारीत आहे. अर्थात हे मल्ल्याच्या सोईसाठी नाही, तर केंद्र सरकारला मदत आणि ब्रिटीश कोर्टाला दाखवण्यासाठी आहे. सरकारी विश्रामगृह जेलमध्ये बदलण्यास तयार आहोत, असं महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला सांगितलं आहे. भारतातील जेल खराब, अस्वच्छ आहेत, असा युक्तीवाद मल्ल्याच्या वकिलांनी ब्रिटीश कोर्टात केला होता. त्याला खोडून काढण्यासाठी आणि मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारने राज्य सरकारकरवी ही खेळी केली. केंद्र आणि राज्य सरकार देशाच्या कोणत्याही ठिकाणाचं जेलमध्ये रुपांतर करु शकतं. त्यामुळे जर मल्ल्याच्या प्रत्यार्पणात जेलचा अडथळा येत असेल, तर गेस्ट हाऊसचं रुपांतर जेलमध्ये करु, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी जी सुनावणी होणार आहे, त्याबाबतच्या रणनीतीसाठी गृहमंत्रालयातील अधिकाऱ्यांची आज बैठक होणार आहे. यामध्ये मल्ल्याला कुठे ठेवायचं याबाबत चर्चा होईल. मल्ल्याच्या प्रत्यार्पणाबाबत 4 डिसेंबरला सुनावणी होणार आहे, मात्र त्यापूर्वीचा युक्तीवाद 20 नोव्हेंबरला होईल. दरम्यान, सरकारने विजय मल्ल्याला ठेवण्यासाठी मुंबईतील आर्थर रोड जेलची चाचपणी केली आहे. या जेलमधील 12 नंबरच्या बराकमध्ये पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबला ठेवण्यात आलं होतं. इथेच मल्ल्याला ठेवण्याचं नियोजन आहे. या बराकमध्ये एसी सोडून सर्व व्यवस्था युरोपीय जेलप्रमाणेच आहेत. कोट्यवधीचं कर्ज बुडवलं किंगफिशर प्रकरणात विजय मल्ल्यावर कोट्यवधींचं कर्ज आहे. बँकांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याचा मल्ल्यावर आरोप आहे. मल्ल्याकडून एसबीआय बँकेला 6 हजार 963 कोटींची किंमत येणं अपेक्षित आहे. यापूर्वी आयडीबीआय बँकेचं कर्ज चुकवण्यासाठी ईडीने 1411 कोटींची संपत्ती जप्त केली होती. विजय मल्ल्यावर कोणत्या बँकेचं किती कर्ज? स्टेट बँक ऑफ इंडिया – 1600 कोटी पंजाब नॅशनल बँक – 800 कोटी आयडीबीआय बँक – 800 कोटी बँक ऑफ इंडिया – 650 कोटी बँक ऑफ बड़ोदा – 550 कोटी यूनायटेड बँक ऑफ इंडिया – 430 कोटी सेंट्रल बँक ऑफ इंडिया – 410 कोटी यूको बँक – 320 कोटी कॉर्पोरेशन बँक ऑफ इंडिया – 310 कोटी सेंट्रल बँक ऑफ म्हैसूर – 150 कोटी इंडियन ओव्हरसीज़ बँक – 140 कोटी फेडरल बँक – 90 कोटी पंजाब सिंध बँक – 60 कोटी अॅक्सिस बँक – 50 कोटी संबंधित बातम्या

आर्थर रोडमध्ये जिथे कसाबला ठेवलं, तिथेच माल्ल्याला ठेवणार

कर्जबुडव्या विजय मल्ल्याला अटक आणि लगेच जामीन

विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी मोदींकडून ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट