नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला मृत असल्याचे घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर पोस्टमार्टमसाठी त्याला नेण्यात आलं. मात्र पोस्टमॉर्टमला ठेवलं असताना या व्यक्तीच्या शरीरात हालचाल जाणवली. त्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याच्यावर सध्या उपचार सुरू असून आता त्याची प्रकृती सुधारत आहे.


कर्नाटकात एका रस्ते अपघातात 27 वर्षीय व्यक्तीला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं होतं. बेलागवी येथील शंकर गोम्बी नावाच्या व्यक्तीला खासगी रुग्णालयाला दोन दिवसांच्या निरीक्षणानंतर मृत घोषित करण्यात आले. 27 फेब्रुवारी रोजी महालिंगपूर येथे झालेल्या अपघातानंतर त्याच्या कुटुंबीयांना मृतदेह घेण्यास सांगण्यात आले. मृतदेह बागलकोट येथील महालिंगपूर शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला. सोमवारी त्या व्यक्तीचं पोस्टमॉर्टम होणार होतं आणि सोमवारी त्याच्या कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी देखील केली होती.


मात्र या मृत व्यक्तीमध्ये अचानक जीव आला आणि ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. डॉ.एस.एस. गलगली या वक्तीचे पोस्टमॉर्टम करणार होते. एस.एस. गलगली म्हणाले, पोस्टमॉर्टमला जाताना ही व्यक्ती जिवंत राहील अशी मला अपेक्षा नव्हती. गोम्बी अद्याप व्हेंटिलेटरवर असल्याच गलगली यांना जाणवलं. खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शंकरला व्हेंटिलेटरवरुन काढून टाकल्यानंतर त्याचे श्वास घेणे बंद झाले होते, असं डॉक्टरांनी शंकरच्या कुटुंबियांना सांगितलं होतं. त्यामुळे अंतिमच्या संस्काराची तयारीही कुटुंबियांनी सुरू केली होती. गलगली यांनी सांगितले की, शंकरच्या मित्रांनी त्यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि मी रूग्णालयात पोहोचताच तिथे किमान 1000 लोक जमले होते.


जेव्हा शंकर गोम्बीचे पोस्टमॉर्टम सुरु केलं तेव्हा त्याच्या अंगावर काटा उभा राहिल्याचं डॉ. गलगली यांनी पाहिल. याचा अर्थ त्याच्या शरीरात हालचाल होती. यानंतर शंकरच्या हृदयाचे ठोके तपासले असता ते सुरु असल्याचं निदर्शनास आले. मग मी जरा थांबलो. शंकरने हात पुढे केल्यावर मला आश्चर्य वाटले. यानंतर मी ताबडतोब त्याच्या कुटुंबियांना बोलावलं आणि त्याला दुसर्‍या खासगी रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. गलगली पुढे म्हणाले की, आपल्या 18 वर्षांच्या कारकीर्दीत 400 हून अधिक पोस्टमॉर्टम केले आहेत, परंतु असा प्रकार कधीही अनुभवला नाही. या प्रकरणी पोलिसात कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.