West Bengal Coal Scam Case : अंमलबजावणी संचालनालयानं (Enforcement Directorate) पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध बेकायदेशीर कोळसा घोटाळा प्रकरणातील (Coal Scam Case) मुख्य आरोपी अनुप माझी याच्या दोन साथीदारांची सुमारे 25 कोटी रुपयांची जंगम स्थावर मालमत्ता सुरुवातीला जप्त केली आहे. या दोन साथीदारांची नावं जयदेव मंडल आणि गुरुपाद मांझी अशी आहेत. दरम्यान, कोळसा घोटाळा प्रकरणी पश्चिम बंगालच्या मुखमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सोबतच त्यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नी हेदेखील ईडीच्या रडारवर आले होते. ईडीकडून अनेकदा त्यांची चौकशीही करण्यात आली आहे.
शेल कंपन्यांच्या माध्यमातून हेराफेरी
ईडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं की, मनी लांड्रिंग (Money Laundering Act) कायद्यांतर्गत सीबीआयनं (CBI) 27 नोव्हेंबर 2022 रोजी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे या लोकांविरोधात एफाआयआर दाखल करत तपास सुरू करण्यात आला होता. ईडी चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुपाद मांझी यानं गुन्ह्यातून कमावलेले 89 कोटींहून अधिक रुपये आणि जयदेव मंडल यानं 2017 ते 2020 दरम्यान अनुपमा जी च्या लोकांना 58 कोटींहून अधिक रक्कम दिली होती.
जयदेव मंडल आणि गुरुपाद मांझी या दोघांवर आरोप आहे की, ग्रुप अगा माझीमध्ये कोलकाताच्या 6 शेल कंपन्यांच्या माध्यमातून 104 कोटी रुपयांच्या गुन्ह्याची रकमेची अफरातफरी केली. तसेच, याच रकमेचा वापर करुन या दोघांनी जंगम स्थावर मालमत्ता जमा केल्याचाही त्यांच्यावर आरोप लगावण्यात आला आहे.
ईडीकडून 25 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
प्राथमिक तपासानंतर, ईडीनं काल (मंगळवारी) या दोन आरोपींच्या 25 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जंगम स्थावर मालमत्ता जप्त केल्या आहेत. यापूर्वी या प्रकरणी ईडीनं 56 ठिकाणी छापे टाकले होते. यासोबतच 181 कोटी रुपयांहून अधिक किमतीची जंगम स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीनं विकास मिश्रा, अशोक मिश्रा आणि गुरुपद मांझी यांनाही अटक केली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी न्यायालयात आरोपपत्रही सादर करण्यात आलं असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.