Mamata Banerjee Car Accident : आपल्याला त्या अपघातात मृत्यूनेच गाठलं असते, अशी प्रतिक्रिया पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी व्यक्त केली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात त्यांना दुखापत झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना अपघाताच्या घटनेची माहिती दिली.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (२४ जानेवारी) सांगितले की, नियोजित कार्यक्रम आटोपून मी वर्धमानहून परतत होते. यादरम्यान, माझी कार दुसऱ्या कारला धडकू नये म्हणून ड्रायव्हरला अचानक ब्रेक लावावा लागला. अशा स्थितीत माझ्या डोक्याला दुखापत झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला, मात्र चालकाने संयम राखला. चालकाने हे केले नसते तर आमची गाडी दुसऱ्या वाहनाला धडकली असती.
बॅनर्जी पुढे म्हणाले, “अपघाताच्या वेळी माझ्या कारची खिडकी उघडी होती. ती बंद राहिली असती तर अपघात अधिक धोकादायक होऊन मला जीव गमवावा लागला असता. लोकांच्या प्रार्थनांमुळे माझा जीव वाचला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करणार असल्याचेही ममता यांनी सांगितले. खराब हवामान असल्यामुळे आपल्याला रस्ते मार्गाने प्रवास करावा लागत असल्याचे ममता बॅनर्जी यांनी म्हटले.
ममता यांच्या डोक्याला दुखापत
दुसऱ्या वाहनाला धडकू नये म्हणून ममता बॅनर्जी याची कार अचानकपणे थांबवल्याने त्यांच्या कपाळावर जखम झाली. वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, ममता बॅनर्जी कारच्या पुढील बाजूस, ड्रायव्हरच्या शेजारी बसल्या होत्या. कारला ब्रेक लावल्याने बॅनर्जी यांचे कपाळ समोरच्या काचेवर आदळले आणि त्यात दुखापत झाली.
सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ममता बॅनर्जी राज्याच्या पूर्व आणि पश्चिम बर्दवान जिल्ह्यात पोहोचल्या होत्या. पावसामुळे ममता बॅनर्जी रस्त्याने कोलकाता येथे परतत असल्याची माहिती समोर आली आहे. कमी दृश्यमानता आणि रस्त्यावरील धुके यामुळे हा अपघात झाला. गाडीने ब्रेक लावल्याने मुख्यमंत्र्यांच्या डोक्याला दुखापत झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कार दुसऱ्या वाहनाला धडकू नये म्हणून अचानक थांबवण्यात आली. त्यावेळी हा अपघात झाला.