कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या कट्टर विरोधक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन यांची भेट घेतली. कोलकाता विमानतळावर मंगळवारी ममता बॅनर्जी आणि जशोदाबेन यांची अचानक भेट झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन झारखंडच्या धनबाद येथून परतत होत्या. तर ममता बॅनर्जी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी निघाल्या होत्या. जशोदाबेन यांना विमानतळावर पाहताच ममता बॅनर्जी जशोदाबेन यांची भेट घेण्यासाठी त्यांच्याकडे धावत गेल्या.



काही मिनिटांच्या या भेटीमध्ये ममता बॅनर्जी आणि जशोदाबेन यांनी एकमेकांशी गप्पा मारल्या. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी जशोदाबेन यांना एक साडी भेट म्हणून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जशोदाबेन समोवारी पश्चिम बंगालच्या पश्चिम वर्धमान जिल्ह्यातील आसनसोलमधील कल्याणेश्वरी मंदिरात नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पूजा केली.


जशोदाबेन पश्चिम बंगालमध्ये येणार असल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनाही नव्हती. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य प्रशासनाला याची माहिती होती, त्यामुळेच कल्याणेश्वरी मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.