नवी दिल्ली: एकीकडे कर्नाटक विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना, तिकडे दिल्लीत मात्र भाजपविरोधक एकवटत आहेत. नुकतंच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.
शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदेतल्या कार्यालयात चर्चा झाली. या भेटीचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र ममतांची आजची दिल्ली भेट ही 2019 साठी काही नवी समीकरणे घडवणार का, अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.
दरम्यान, या भेटीवेळी शरद पवारांसह खासदार प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण, धनंजय महाडिक आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
संजय राऊत ममतांच्या भेटीला
पवार-ममता भेटीच्या काही वेळापूर्वी दिल्लीत आणखी एक चर्चात्मक भेट झाली. ही भेट होती शिवसेना खासदार संजय राऊत आणि ममता बॅनर्जी यांची.
ममता-राजू शेट्टी भेट
ममता बॅनर्जींनी आज दिल्लीत भेटसत्रच घेतलं. कारण शरद पवार आणि संजय राऊत यांच्याशिवाय ममतांनी तिसरी भेट घेतली ती म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची.
संजय राऊत आणि राजू शेट्टी हे एकाचवेळी ममतांच्या भेटीला गेले होते.
एकंदरीत दिल्लीतील या भेटीगाठीवरुन भाजपविरोधी पक्षांच्या हालचालींना वेग आल्याचं दिसतं.
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काही दिवसांपूर्वी सर्व विरोधकांना एकत्र करुन डिनर पार्टीचं आयोजन केलं. त्यानंतर मोदीविरोधकांना एकत्र करण्याची मोहीम सुरु आहे. दिल्लीतील डिनर पार्टीला ममता बॅनर्जी उपस्थित नव्हत्या.