नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. मात्र निवडणूक आयोगाने घोषणा करण्यापूर्वीच भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी तारीख जाहीर केली.

12 मे रोजी मतदान, तर 18 मे रोजी मतमोजणी होईल, असं ट्वीट अमित मालवीय यांनी केलं. मात्र काही क्षणातच निवडणूक आयोगाने तारीख जाहीर केली. त्यानुसार 12 मे रोजी मतदान, तर 15 मे रोजी मतमोजणी होणार आहे. हे लक्षात येताच अमित मालवीय यांनी ट्वीट डिलीट केलं.

योग्य ती कारवाई करण्यात येईल : निवडणूक आयोग

दरम्यान, निवडणूक आयोगाने यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं. पत्रकार परिषद सुरु असतानाच पत्रकारांनी हा प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोगाच्या अगोदर भाजपकडे तारीख कशी, असा प्रश्न विचारला असता चौकशी करुन योग्य ती कारवाई करण्यात येईल, असं निवडणूक आयोगाने सांगितलं.

टाइम्स नाऊ पाहून ट्वीट केलं : अमित मालवीय

निवडणूक आयोगापूर्वीच तारीख जाहीर करणाऱ्या अमित मालवीयांना ट्विटरवर ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यांनी काहींच्या ट्वीटला उत्तरही दिलं. मात्र आपण टाइम्स नाऊ हे चॅनल पाहून ट्वीट केलं, 'टाइम्स नाऊ'वर तारीख दाखवण्यात आली, असा दावा अमित मालवीय यांनी केला.



कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे, तर 15 मे रोजी मतमोजणी होईल. निवडणूक आयोगाने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. एकाच टप्प्यात 56 हजार मतदान केंद्रांवर हे मतदान होईल. या निवडणुकीत 4.96 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतील.