Today Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या मिचॉन्ग चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल जाणवत आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ तीव्र झालं आहे. या चक्रीवादळाचा परिणाम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये सर्वाधिक होण्याचा अंदाज आहे. पुढील तीन दिवसात आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. रविवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र अधिक मजबूत होऊन त्याचं मिचॉन्ग चक्रीवादळात रुपांतर होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आता मिचॉन्ग चक्रीवादळ तयार होत आहे.


पुढील 48 तासांत या भागात जोरदार पाऊस


तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तासांत या भागात चक्रीवादळामुळे जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शनिवारी, तामिळनाडूमधील तिरुवल्लूर आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांतील विविध भागात जोरदार पाऊस झाला. हवामान विभागाने या राज्यातील किनारी भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 


चक्रीवादळामुळे 'या' भागात रेड अलर्ट


मिचॉन्ग चक्रीवादळाचा सर्वाधिक धोका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ सोमवारी सकाळी चेन्नईकडून पुढे सरकून नेल्लोर आणि मछलीपट्टणम दरम्यान धडकण्याची शक्यता आहे. आयएमडी (IMD) ने वर्तवलेल्या अंदाजानुसार चक्रीवादळामुळे या भागात ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या वादळाच्या पार्श्वभूमीवर तिरुवल्लूर जिल्ह्यात सोमवारसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


'या' भागात जोरदार पावसाची शक्यता


भारतीय हवामान विभागाने (IMD) 4 डिसेंबरच्या संध्याकाळी आंध्र प्रदेशातील मछलीपट्टणम आणि चेन्नई दरम्यान चक्रीवादळ येण्याची शक्यता वर्तवली आहे. या चक्रीवादळाचा परिणाम तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशवर जास्त दिसेल. या चक्रीवादळामुळे तेलंगणा, केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम बंगालच्या उपसागराला लागून असलेल्या सागरी क्षेत्रावरील कमी दाबाचे क्षेत्र शुक्रवारी खोल दाबामध्ये रूपांतरित झालं, ही चक्रीवादळाच्या निर्मितीची सुरुवात मानली जाते.


4 डिसेंबरदरम्यान चक्रीवादळाचा लँडफॉल होण्याची शक्यता


हवामान विभागानुसार, 3 डिसेंबरच्या सुमारास दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात खोल दाबाचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. यानंतर ते उत्तर-पश्चिम दिशेकडे सरकून दक्षिण आंध्र प्रदेश आणि आजूबाजूचा परिसर ओलांडून पुढे जाईल. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, चेन्नई आणि मछलीपट्टणम दरम्यानच्या उत्तरेकडील तामिळनाडू किनारपट्टी 4 डिसेंबरच्या चक्रीवादळाचा लँडफॉल होऊ शकतो.