IMD Rain Alert : सध्या देशभरात वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून नैऋत्य मान्सून माघारी फिरण्यास म्हणजेच परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. काही भागांत अद्याप मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे, तर काही भागांत उन्हाच्या झळा बसत आहेत. देशातील काही राज्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, मेघालयसह सिक्कीमध्ये अतिवृष्टी झाली असून पुढील 24 तासांतही या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील 24 तासांत जोरदार पाऊस
गेला-गेला म्हणतो तोच पावसानं पुन्हा एन्ट्री घेतली आहे. राज्यासह देशात काही ठिकाणी सोमवारी जोरदार पाऊस झाला असून पुढील 24 तासांतही विविध ठिकाणी पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील 2-3 दिवसांत कर्नाटकचा आणखी काही भाग आणि तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्राचा उर्वरित भाग येथून मान्सून प्रवास संपवून माघारी परतणार आहे. त्याशिवाय बिहार, झारखंड, छत्तीसगडपश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या काही भागांतून नैऋत्य मान्सून माघारी परतण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.
राज्यात बहुतांश भागातून मान्सूनचा काढता पाय
महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांतून मान्सूनने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे अनेक भागांत तापमान वाढलं आहे. तर, काही तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. सध्या महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु असून पुढील काही दिवसात मान्सून पूर्णपणे माघार घेईल. ठाणे, मुंबईसह उपनगरातही मान्सून माघारी परतला आहे. त्यामुळे या भागात उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.