Weather Update Today : बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे हवामानात (Weather Forecast) मोठा बदल होताना दिवस आहे. राज्यासह देशभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी (Unseasonal Rain) पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. 2 ते 4 डिसेंबर या काळात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आज आणि उद्या महाराष्ट्रासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे.


वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज


भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत अधिक तीव्र होण्याची अपेक्षा आहे. पुढील 24 तासांत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. या हवामानामुळे पुढील दोन दिवसांत मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात विजांच्या गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. याशिवाय, वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभावही कायम राहणार आहे, यामुळे पर्वतीय प्रदेशात बर्फवृष्टी होईल आणि लगतच्या मैदानी प्रदेशात थंडीची लाट येईल.


पुढील 24 तासांत चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता


1 डिसेंबर रोजी पहाटे 5:30 वाजता दक्षिण-पूर्व लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र चेन्नईच्या 800 किमी आग्नेय, पुद्दुचेरीच्या सुमारे 790 किमी पूर्व-दक्षिणपूर्व अक्षांश 9.1 अंश उत्तर आणि रेखांश 86.4 अंश पूर्वेजवळ दक्षिणपूर्व शेजारील नैऋत्य बंगालच्या उपसागरावर केंद्रित झालं आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र पुढील 24 तासांत चक्रीवादळात रुपांतरित होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे दक्षिण आंध्र प्रदेश आणि लगतच्या उत्तर तामिळनाडू किनारपट्टीला याचा धोका आहे, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. 


'या' भागात ऑरेंज अलर्ट


तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकल किनारपट्टीसाठी हवामान कार्यालयाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 2 ते 4 डिसेंबर या काळात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तामिळनाडूतील चेंगलपट्टू, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात जोरदार पाऊस होणयाची शक्यता आहे. 4 डिसेंबरपर्यंत उत्तर किनारपट्टीवरील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसासह हलका ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. 2 ते 4 डिसेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 3 आणि 4 डिसेंबरला आंध्र प्रदेशात दक्षिण किनारपट्टी भागात अनेक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.


कुठे पाऊस तर, कुठे बर्फवृष्टी


देशाच्या उत्तर भागातही पावसाने हजेरी लावली. चंदीगडमध्ये गुरुवारी सकाळीपासून जोरदार पाऊस आणि गारपीट झाल्याचं दिसून आलं आहे, तर श्रीनगरमध्ये हलका पाऊस पाहायला मिळाला आहे. पुंछमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे.