Heavy Rain in India : देशभरात मुसळधार पाऊस (Rain) सुरु आहे. डोंगराळ भागांसह मैदानी प्रदेशात सर्वत्र पाऊस कोसळत आहे. दरम्यान, हा आठवडा पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, हा आठवडा मुसळधार पाऊस कोसळणार असून पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर ओडिसा, पश्चिम बंगाल आणि झारखंड दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. यामुळे पुढील पाच दिवस मध्य आणि पूर्व भारतात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार
सध्या देशाच्या उत्तरेकडील भागात धो-धो पाऊस कोसळत असून नदी-नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, 17 जुलैपासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडसह भारताच्या पश्चिम भागात जोरदार पावसाची शक्यता असून आठवडाभर पावसाचा जोर कायम राहणार आहे.
महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा
राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, येत्या आठवड्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भाच्या काही भागातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
'या' राज्यांमध्ये पुढील चार दिवस मुसळधार पाऊस
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे गंगाही धोक्याच्या पातळीवर आली आहे. पश्चिम उत्तर प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या अनेक भागात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस सुरू राहणार आहे. हरियाणा-चंदीगडमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. डोंगराळ भागातही मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा कहर हिमाचल प्रदेशातही कायम आहे.
उत्तराखंडमध्ये अनेक भागांत भूस्खलन झालं आहे, यामुळे ठिकठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. श्रीनगरमध्ये ही जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे अलकनंदा आणि गंगा नदी दुथडी भरून वाहत आहे. गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. संगम घाट, रामककुंड, घनेश्वर घाट आणि फुलाडी घाटात पाणी साचलं आहे.