Weather Update Today : देशभरात पावसाची (Rain) संततधार सुरूच आहे. राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. अशातच आणखी दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
आज या भागांत मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पूर्व राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, कोकण आणि गोव्यात वेगवेगळ्या भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्र, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल, ओरिसा, झारखंड, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उप-हिमालय पश्चिम बंगाल, सिक्कीम, कर्नाटकमध्ये वादळी पावसाची शक्यता आहे.
उत्तराखंडच्या डेहराडून, बागेश्वर आणि चमोली येथे आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. याबरोबरच संपूर्ण राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात 29 ते 31 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा येलो अलर्ट आहे. याबरोबरच पुढील काही दिवस उत्तराखंडमधील अनेक भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातही पुन्हा पावसाची प्रक्रिया सुरू झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील 50 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा दिला आहे. याबरोबरच उत्तर प्रदेशातील 32 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरसह या भागांत मुसळधार पावसाची शक्यता
हवामान विभागानुसार, अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, बिहार, जम्मू आणि काश्मीर, लडाख, पूर्व मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, छत्तीसगडमध्येही आज मुसळधार पाऊस पडणार आहे. याशिवाय तामिळनाडू, पुद्दुचेरीच्या विविध भागात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. झारखंड आणि मेघालयमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडणार आहे.
पीटीआय एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने हिमाचल प्रदेशात शनिवारी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या स्थानिक कार्यालयाने सांगितले की, मुसळधार पावसामुळे भूस्खलन आणि अचानक पूर येण्याची शक्यता आहे. तसेच, नद्या आणि नाल्यांमधील पाण्याचा प्रवाह देखील वाढू शकतो. हवामान विभागाने सोलन, शिमला आणि सिरमौर जिल्ह्यात अचानक पूर येण्यासाठी मध्यम ते उच्च धोक्याचा इशारा जारी केला आहे. त्याचवेळी राज्यात 3 ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :