Weather Update : उत्तर भारतात पावसानं (North India Rain) थैमान घातलं आहे. यामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. पावसामुळं आत्तापर्यंत उत्तर भारतात 37 जणांचा मृत्यू झाला आहे. मदत आणि बचाव कार्याला गती देण्यासाठी लष्कर आणि एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी परिस्थितीची माहिती घेतली आहे. केंद्र सरकारकडून सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले आहे.


हिमाचल प्रदेशात 18 जणांचा मृत्यू


गेल्या काही दिवसापासून हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळं अनेक भागात पूर आला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बहुतांश जलविद्युत प्रकल्पांचे पावसामुळं नुकसान झालं आहे. शेकडो कोटींच्या मालमत्तेचे नुकसान झालं आहे. एकट्या शिमला जिल्ह्यात सोमवारी भूस्खलनात चार जणांचा मृत्यू झाला. शिमल्याच्या थेओग उपविभागात सोमवारी सकाळी एका घरावर दरड कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला.


उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, आठ जणांचा मृत्यू


उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात गेल्या 24 तासांत सरासरीपेक्षा 2.5 ते 3 पट जास्त पाऊस झाला आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळं वाहनांचे अपघात आणि घरांची पडझड होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरड कोसळण्याची शक्यता असल्याने सरकारने लोकांना सावधगिरीने प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. 11 ते 12 जुलैसाठी, कुमाऊं आणि त्याच्या लगतच्या गढवाल, चमोली भागात अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


दिल्लीत मुसळधार पाऊस, यमुना नदीनं ओलांडली धोक्याची पातळी


दिल्लीत गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळं यमुना नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधून पाणी सोडण्यात आल्यानंतर यमुनेच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. दिल्लीत यमुनेने धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. धोक्याच्या चिन्हाची मर्यादा 205.33 मीटर असून यमुनेतील पाण्याची पातळी 206.24 मीटरवर पोहोचली आहे. यमुनेतील पूर पातळी 207.49 मीटर आहे. त्यामुळं दिल्लीत पुर परिस्थिती निर्माण शक्यता वाढली आहे.


पंजाब आणि हरियाणामध्ये मुसळधार पाऊस


दरम्यान, पंजाब आणि हरियाणामध्ये मुसळधार पावसामुळं नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर राजस्थानमध्ये सात आणि उत्तर प्रदेशमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर भारतात दिल्लीतील यमुनेसह अनेक नद्यांना पूर आला आले आहे.


उत्तर भारतातील अनेक भागात अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. अनेक ठिकाणी वाहने पुरात वाहून गेल्याचे दिसून आले. उत्तर भारतातील चार राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पुराचा सामना करण्यासाठी एकूण 39 एनडीआरएफ टीम तैनात करण्यात आली आहेत. तर पंजाबमध्ये NDRF च्या 14 टीम कार्यरत आहेत, तर डझनभर टीम हिमाचल प्रदेशात, आठ उत्तराखंडमध्ये आणि पाच हरियाणामध्ये तैनात आहेत. देशाची राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज सर्व शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


IMD Rain Update : उत्तर भारतात 'जलप्रलय'...हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना तडाखा; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा