मुंबई : हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. हवामान विभागाने 21 मे ला मान्सून अंदमानात येण्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मान्सून अंदमान निकोबार बेटावर वेळेत दाखल झाला आहे. 


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचले असून बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे अंदमान निकोबार बेटावर  मान्सूनचा परिणाम दिसून येत आहे. पुढील 48 तास हा परिणाम दिसून येईल. 






 मान्सून एक दिवस आधीच केरळमध्ये  धडकणार 


 दरवर्षी 1 जून रोजी हजेरी लावणारा मान्सून यावर्षी एक दिवस आधीच केरळात दाखल होणार आहे. मान्सून यावर्षी सरासरी 103 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  प्रतीवर्षी सरासरी प्रमाणे १ जून रोजी मान्सून केरळात हजेरी लावत असतो.  मात्र यंदा तोक्ते चक्रीवादळामुळे  तो आधीच दाखल होण्यचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामान विभागानं यंदा 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. 


तोक्ते (Cyclone tauktae) चक्रीवादळाचा हा सकारात्मक परिणाम झाला आहे.  मान्सूनसाठी पोषक हवामान तयार झाल्यानं मान्सून लवकर दाखल होणार आहे. दर वर्षीच्या सरासरीनुसार केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर 8 ते 10 दिवसांत राज्यात मान्सून दाखल होत असतो. त्यामुळं यंदाही 8 ते 10 जून दरम्यान तळ कोकणातमान्सून दाखल होईल. त्यानंतर 4-5 दिवसांत राज्यात सर्वत्र मान्सूनच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.


यंदा  पाऊससरासरी 103 टक्के कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात सध्या कोरोनाच्या संकटामुळं नागरिक, प्रशासन, सरकार सगळेच हैराण झाले आहेत. मात्र या संकटाच्या काळातही संपूर्ण देशाची घडी देशातल्या शेतकऱ्यामुळं काहीशी चांगली राहिली आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर शेतकऱ्यांसह अर्थव्यवस्थेला फायदा होईल.