PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून वाराणासी येथीस डॉक्टर आणि पॅरामेडिकल स्फाफ शिवाय इतर फ्रंटलाईन वर्कर्स यांच्याशी संवाद साधला. यावेळी मी काशीचा सेवक असल्याच्या नात्यानं काशीनिवासींचे सहृदय आभार मानतो असं म्हणत त्यांनी कोरोना काळात डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, रुग्णवाहिका चालक यांनी जे काम या काळात केलं आहे ते प्रशंसनीय असल्याचं म्हणत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. 


जवळच्या अनेकांनाच आपण या काळात गमावलं आहे, असं म्हणताना पंतप्रधानांना त्यांच्या मनातील भावनांना आळा घालणं कठिण झालं आणि त्यांचं भावूक रुप सर्वांसमोर आणलं. यावेळी पंतप्रधानांनी आपल्यापासून दुरावलेल्या सर्वांनाच श्रद्धांजली वाहिली. 


ही तुमचीच तपश्चर्या आहे, ज्यामुळं बनारसला धीर मिळाला आहे. साऱ्या देशात याची प्रशंसा होत आहे ही बाब अधोरेखित करत यापुढं आपला मंत्र ‘जहां बीमार वहीं उपचार’ हा असणार आहे, याची आठवण सर्वांना करुन दिली. या ओळीचाच आधार घेत मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन त्या ठिकाणी गावांतील घरोघरी औषधं पोहोचवण्याच्या उपक्रमाची त्यांनी प्रशंसा केली. 


CoronaVirus : कोरोनाविरोधातील लढाईत नांदेड जिल्ह्यातील भोसी पॅटर्नची केंद्र सरकार, आरोग्य मंत्रालयाकडून प्रशंसा


सदर उपक्रम हा ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रमाणात व्यापक पद्धतीनं राबवण्यात यावा यासाठी ते आग्रही दिसले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांचं प्रमाण हे दुपटीनं वाढलं आहे. अनेक दिवसांसाठी रुग्णांना रुग्णालयातच रहावं लागत आहे, अशा परिस्थितीमध्ये बनारसमध्ये अनेक आरोग्य सुविधांचं केंद्र, या दृष्टीनं पाहिलं जातं. त्यातच इथंही कोरोनामुळं अनेक आव्हानं उभी राहिली. पण, यामध्येगी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाने आपला स्वत:चा विचार न करता दिवस-रात्र एक करत कामं केली. वैयक्तिक अडचणी दूर लोटत ही मंडळी कार्यरत राहिली, असं म्हणत त्यांच्या कार्यामुळंच आज बनारसला आधार मिळाला आहे हा मुद्दा त्यांनी उचलून धरला. 






अतिशय कमी वेळात कोरोनासाठी गरजेच्या असणाऱ्या आरोग्य सुविधा एकवटत त्या रुग्णांच्या सेवेत देणाऱ्या बनारसवर यावेळी पंतप्रधानांनी स्तुतीसुमनं उधळली. दुकानं, बाजारपेठा बंद करत काशीमध्ये लोकांनी नफ्याचाच विचार न करता कोरोना काळात समाजसेवेला प्राधान्य दिल्याबद्दल मोदींनी सामाजिक भान जपणाऱ्या प्रत्येकाप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.