ऋषिकेश : चिपको आंदोलनाचे प्रणेते आणि प्रसिद्ध पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे निधन झाले. बहुगुणा यांच्यावर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, एम्स ऋषिकेश येथे उपचार सुरु होते. उपचारा दरम्यान दुपारी 12 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ते 94 वर्षाचे होते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, बहुगुणा यांना मधुमेह होता. त्याचबरोबर त्यांना कोरोनाबरोबर निमोनियाची देखील झाला होता. तसेच त्यांना इतर आजार देखील होते. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 86 वर आली होती. बहुगुणा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर 8 मे ला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी 1970साली सुरू केलेले आंदोलन संपूर्ण देशभर पसरले. चिपको आंदोलन हे त्याचाचा एक भाग होते. सुंदरलाल बहुगुणा यांनी गौरा देवी आणि अन्य सहकाऱ्यांसह जंगल वाचवण्यासाठी चिपको आंदोलनाची सुरुवात केली होती. 26 मार्च, 1974 चमोली जिल्ह्यात ग्रामीण भागातील महिला झाडांना मिठी मारून उभ्या राहिल्या. त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण देशभर गाजलं होते.
देशाने निसर्ग ऋषी गमावला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पद्मविभूषण सुंदरलाल बहुगुणा यांच्या निधनाने आज देशाने एक निसर्ग ऋषी गमावला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करून सुंदरलाल बहुगुणा यांना मुख्यमंत्र्यांनी आपली श्रद्धांजली वाहिली केली आहे. चिपको आंदोलनातून सुंदरलाल बहुगुणा यांनी केवळ झाडे वाचवली नाहीत तर घराघरात पर्यावरण रक्षणाची चळवळ नेली. सामान्यातील सामान्य माणसाच्या हक्कांसाठी त्यांनी आवाज उठवला.पर्यावरण रक्षणासाठी जीवन वेचणारे बहुगुणा हे जगभरातील पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणास्थान होते. निसर्गाबद्दल नितांत आदर, जिव्हाळा असणारा निसर्गऋषी आपण गमावला आहे.