Weather Update Today : सध्या नवे वेस्टर्न डिस्टर्बन्स आणि 'मिचॉन्ग' चक्रीवादळाचा (Michong Cyclone) प्रभाव देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये दिसत आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) सुरू आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh), तामिळनाडू (Tamil Nadu), ओडिशासह (Odisha) अनेक राज्यांमध्ये हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, आज म्हणजेच, मंगळवारी (5 डिसेंबर) उत्तर प्रदेश (Uttar Pradesh), बिहार (Bihar), झारखंडच्या (Jharkhand) अनेक भागांत पावसाची शक्यता आहे.


बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) मिचॉन्ग चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्वेकडील वाऱ्यांनी पश्चिमेकडून येणाऱ्या थंड हवेचा मार्ग अडवला आहे. परिणाम: गेल्या 24 तासांत कमाल तापमानात 4.2 अंश सेल्सिअसनं वाढ होऊन ते 28.2 अंशांवर पोहोचलं आहे. सामान्यपेक्षा दोन अंशांनी अधिक तापमान असल्यानं दिवसा उकाडा जाणवत आहे. चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच पश्चिमेकडील थंडीमुळे हवामान आणखी थंड होईल, अशी माहिती हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे. 


चक्रीवादळ मिचॉन्गच्या प्रभावामुळे दोन दिवसांनंतर पूर्वेकडून येणाऱ्या ढगांमुळे रिमझिम पाऊसही होऊ शकतो, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. चक्रीवादळाचा प्रभाव कमी होताच पश्चिमेकडील थंडीमुळे हवामान आणखी थंड होईल, हवेतील गारवा वाढेल, असंही हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 


येत्या 24 तासांत चेन्नईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस 


भारतीय हवामान विभागानं (Weather Update Today) दिलेल्या माहितीनुसार, पुढील 24 तासांमध्ये चेन्नई, तिरुवल्लूर, कांचीपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मिचॉन्ग चक्रीवादळ किनारपट्टीजवळ आल्यानं चेन्नईच्या अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला. 


उत्तर प्रदेशातील 20 जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, नव्या सायक्लॉन सर्क्युलेशनमुळे, लखनौसह पूर्व आणि दक्षिण उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये आणि बुंदेलखंडमधील 20 जिल्ह्यांमध्ये सोमवार 7 डिसेंबरपर्यंत रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे.


येत्या 24 तासांत जम्मू-काश्मीर खोऱ्यात हवामान कोरडं राहील. 10 डिसेंबरपर्यंत खोऱ्यातील हवामान कोरडं राहून तापमानात आणखी घट होईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे.


चेन्नईला मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा 


'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे सोमवारी चेन्नई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे चेन्नई विमानतळावरील सर्व ऑपरेशन्स 5 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत रद्द करण्यात आले आहेत. चक्रीवादळामुळे हवाई सेवांव्यतिरिक्त, रेल्वे सेवा रद्द किंवा उशीर झाल्या आहेत. 'मिग्झोम' चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रविवारी रात्री उशिरापासून चेन्नई आणि आसपासच्या चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


चेन्नईला मिचॉन्ग चक्रीवादळाचा तडाखा; इंडिगोकडून रांची-चेन्नई फ्लाईट रद्द, झारखंडहून सुटणाऱ्या ट्रेनही रद्द