IMD Weather Update Today : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट (Cold Wave) कायम आहे. पुढील काही दिवस उत्तर भारतात दाट ते अत्यंत दाट धुक्याची (Fog) स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. यामुळे दृश्यमानतेवर परिणाम होईल. दाट धुक्यामुळे लोकाचं घराबाहेर पडणं अवघड झालं आहे. देशाच्या अनेक भागात किमान तापमान कमी राहण्याची शक्यता आयएमडीने (IMD) व्यक्त केली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक राज्यांमध्ये दाट धुके आणि थंडीचा इशारा जारी केला आहे. 


दिल्लीत दाट धुक्याची चादर


डोंगराळ भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे दिल्लीत पुन्हा एकदा थंडी वाढली आहे. सकाळच्या तापमानातही लक्षणीय घट नोंदवण्यात आली आहे. धुकेही कायम असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दृष्यमानता कमी झाल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यासोबतच ट्रेन आणि विमान उड्डाणांवरही परिणाम झाला आहे. पुढील दोन दिवस हीच स्थिती कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. शुक्रवारी सकाळी दिल्लीतील बहुतांश भागात मध्यम ते दाट धुके दिसले.


किमान तापमानात घट होण्याची शक्यता


भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 27 ते 30 जानेवारी दरम्यान पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशच्या अनेक भागांमध्ये रात्री आणि सकाळी दाट ते अत्यंत दाट धुके राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातही अनेक भागात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. विदर्भ, कोकणात किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टी


हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेशातील उंच भागात हवामान बदललं आहे. रोहतांग पास, पांगी आणि राज्यातील इतर उंच पर्वतीय भागात हिमवृष्टी झाली आहे. पावसाच्या आणि बर्फवृष्टीच्या दरम्यान तापमानात आणखी घट झाल्याचं दिसून येत आहे. बर्फवृष्टीनंतर पांगी भागात थंडीची लाट वाढली आहे. राजधानी शिमलामध्ये शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होतं. मध्येच हलका सूर्यप्रकाश पाहायला मिळाला.


1 फेब्रुवारीपर्यंत हवामान कसं असेल?


हवामान केंद्र शिमलाने जारी केलेल्या ताज्या माहितीनुसार, हिमाचलच्या मध्यवर्ती आणि उंच टेकड्यांवरील अनेक भागात पुढील सहा दिवस खराब हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. या कालावधीत, किन्नौर, लाहौल-स्पीती, शिमला, सोलन, सिरमौर, मंडी, कुल्लू आणि चंबा या मध्य आणि उंच पहाडी जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस आणि हिमवर्षाव होऊ शकतो. २७ जानेवारीला आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावामुळे राज्यातील अनेक उंच भागात 1 फेब्रुवारीपर्यंत पाऊस आणि बर्फवृष्टी सुरू राहू शकते.