नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पुढच्या काही काळात चक्क 20 आणि 50 रुपयांच्या नोटाही उपलब्ध होतील, अशी माहिती एसबीआयच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली.


सध्या 100 रुपये आणि त्यापुढी रकमेच्या नोटा एटीएममधून उपलब्ध केल्या जात आहेत. सध्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने बँकांमध्ये गर्दी आहे. या सर्व गोष्टी सुरळीत झाल्यानंतर ग्राहकांच्या सोईसाठी 20 आणि 50 रुपयांच्या नोटाही एसबीआयच्या एटीएममधून ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिल्या जातील. स्टेट ऑफ बँक इंडियाच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी याबाबत माहिती दिली.


20 आणि 50 च्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध झाल्यास लोकांच्या दृष्टीने सोईस्कर होईल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे एसबीआय आपल्या एटीएममध्ये 20 आणि 50 च्या नोटा कधी उपलब्ध करते, याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. शिवाय, यामुळे पहिल्यांदाच 100 रुपयांखालील रकमेच्या नोटा एटीएममध्ये उपलब्ध होतील.

दरम्यान, काळ्या पैशाविरोधातील लढाईला अधिक बळ मिळावं म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. त्यानंतर नोटांसंदर्भात देशभरात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. या सर्व पार्श्वभूमीवर एसबीआय अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांची माहिती नक्कीच महत्त्वाची मानली जाते आहे.